मान्सून वेळेआधी परतणार, थंडी लवकर येणार, परतीचा प्रवास संभ्रमात: पण एक-दाेनदा चांगल्या पावसाचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 07:39 AM2022-08-31T07:39:42+5:302022-08-31T07:40:57+5:30
Monsoon : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला
- निशांत वानखेडे
नागपूर : पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. त्यामुळे मान्सूनने परतीचा प्रवास तर सुरू केला नाही ना असा संभ्रम आहे. हवामान विभागाने मात्र यास नकार दिला; पण दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ३० सप्टेंबरपर्यंत ताे महाराष्ट्रातून निघून जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीही सुरू हाेईल, असा अंदाज आहे.
तज्ज्ञांच्या मते, गेल्या पाच-सहा वर्षांपासून पर्यावरणाचे चक्र बदलले. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने परतीचा काळही लांबणीवर गेला. गेल्या वर्षी ऑक्टाेबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पाऊस हाेता आणि शेवटच्या आठवड्यात थंडीची चाहूल लागली हाेती.
दरवर्षी साधारणत: १८ ते २० सप्टेंबरदरम्यान परतीचा प्रवास
सुरू हाेताे. मात्र, यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर झाले. जूनमध्ये कमतरता असली तरी जुलै
आणि ऑगस्टमध्ये पावसाने जाेरदार हजेरी लावली.
बदललेल्या हवामान चक्रानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस परतीचा प्रवास सुरू करेल. ज्या वेगाने बरसला, त्या वेगाने निघून जाईल. ३० सप्टेंबरपर्यंत ताे गेलेला असेल. यावर्षी ज्याप्रमाणे उन्हाळ्यात उष्ण लहरी व पावसाने सतावले, त्याप्रमाणे थंडीही सतावेल. हिवाळ्याचा तडाखा तीव्रपणे जाणवेल. - सुरेश चाेपणे, हवामानतज्ज्ञ
विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक
n विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत एकूण सरासरीपर्यंत पाऊस बरसला आहे.
n यामुळे यावर्षी हवामानाचे चक्र बदलले असून, मान्सूनही लवकर परतणार आहे.
n राजस्थानमधून देशाच्या वायव्य टाेकापासून पावसाचा परतीचा प्रवास सुरू हाेईल आणि ऑक्टाेबरच्या पहिल्याच आठवड्यात थंडीची चाहूल लागेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
n परतीच्या प्रवासादरम्यान विदर्भासह राज्यात एक-दाेनदा पाऊस हाेईल, असा अंदाज आहे.
n विदर्भात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेईल, तर मुंबई, काेकण, गाेव्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.