मान्सूनची चाहुल : यंदा १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात धडकणार?
By निशांत वानखेडे | Published: May 14, 2024 06:38 PM2024-05-14T18:38:24+5:302024-05-14T18:39:22+5:30
आठवडाभरात अंदमान, बंगालच्या उपसागरात दस्तक : नैऋत्य माेसमी वाऱ्याच्या हालचालींचे पूरक संकेत
नागपूर : तसे मे महिन्यात उन्हाच्या तीव्र झळांऐवजी अवकाळीचा गारवा अनुभवणाऱ्या नागरिकांसाठी आणखी एक आनंददायी बातमी हवामान विभागाकडून मिळत आहे. यंदा मान्सूनचा पहिला पाऊस निर्धारित वेळेपूर्वी म्हणजे १० ते १२ जूनपर्यंत महाराष्ट्रात व १२ जूनपर्यंत नागपुरात धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नैऋत्य माेसमी वाऱ्याच्या हालचालीचे मान्सूनसाठी पूरक संकेत मिळत आहेत. सध्या कन्याकुमारीच्या आसपास चक्रीवादळाची स्थिती आहे, तसेच केरळ किणारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचा आस मराठवाड्यापर्यंत दिसत आहे. हे वातावरण मान्सूनच्या आगमनासाठी पूरक मानले जाते. त्यानुसार याच आठवड्याभरात १९ पर्यंत देशाचा नैऋक्त मोसमी पाऊस देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजे बंगालच्या उपसागरात, इंडोनेशियाच्या पश्चिम किनारपट्टी तसेच सुमात्रा बेटापर्यन्त धडक देण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात बंगालच्या उपसागरातही चक्रीवादळ तयार हाेण्याची शक्यता आहे, जी चांगले संकेत देणारी आहे.
नैऋत्य मान्सून साधारणपणे एक जूनपर्यंत देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळ राज्याच्या टोकावर हजेरी लावताे. मात्र सध्या तयार झालेल्या परिस्थितीनुसार ताे त्यापूर्वीच म्हणजे २७ ते २८ मेदरम्यान केरळ किणारपट्टीवर पाेहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर १० ते १२ दिवसात ताे अरबी समुद्रात व तिथून महाराष्ट्रात धडकेल, असा अंदाज आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरामधून नागपूरसह विदर्भात ताे लवकर पाेहचण्याची शक्यता आहे. मात्र १९ मे पर्यंत बंगालच्या उपसागरात गेल्यानंतर तेथे प्रत्यक्षात कशी वाटचाल करतो, यावरच मान्सूनच्या पुढच्या प्रगतीची निश्चिती ठरविली जाईल, असे मतही माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले. म्हणजेच अजुन तीन आठवड्याचा कालावधी लोटावयाचा आहे. त्यानंतरही अरबी समुद्रात ऐन आगमनाच्या काळात एखादे चक्रीवादळ निर्माण झाले तर मान्सूनच्या प्रगतीत काहीसा खंड पडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.