ऑक्टाेबरमध्ये लांबणार नाही, वेळेतच परतेल मान्सून
By निशांत वानखेडे | Published: September 11, 2024 06:26 PM2024-09-11T18:26:43+5:302024-09-11T18:27:16+5:30
‘ला-निना’ प्रभावाला सध्या आधार नाही, तज्ज्ञांचे मत : नवरात्रात वळीव पावसाची शक्यता
नागपूर : सध्या सक्रिय झालेल्या ‘ला-निना’ च्या प्रभावामुळे यंदा सप्टेंबरसह ऑक्टाेबरमध्येही जाेरदार पाऊस हाेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र या अंदाजाला सध्यातरी काेणताही आधार नसल्याने मान्सून ऑक्टाेबरच्या पहिल्या पंधरवाड्यात आपल्या नियाेजित वेळी महाराष्ट्रातून निघून जाईल, असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
शक्यतो ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर म्हणजे १५ ऑक्टोबरनंतर मोसमी पाऊस देशातून निघून जातो व दक्षिण भारतातील चार राज्यात तो ईशान्य किंवा हिवाळी पाऊस या नावाने तो सुरु होतो. ऑक्टोबर महिन्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा काळ सुरू होतो. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यात प्रत्यक्षात मान्सून महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरु करतो. म्हणजे साधारण ५ ऑक्टोबरला माघारी परतत असतांना महाराष्ट्राच्या उत्तरेकडे प्रवेशतो व १५ ऑक्टोबरपर्यंत तो महाराष्ट्रातून बाहेर पडतो. याच दरम्यान महाराष्ट्रात मान्सूनच्या शेवटच्या आवर्तनाचा पाऊस होत असतो. तसाच पाऊस यावर्षी ९ ते १३ दरम्यान पडण्याची शक्यता जाणवते. म्हणजेच घटस्थापनेच्या सातव्या दिवसापासून कदाचित महाराष्ट्रात वळीव स्वरूपाच्या मध्यम पावसाची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाची शक्यता कमी असते व या काळात थंडीची चाहूल जाणवते.
दरम्यान सध्या सक्रिय झालेल्या ला-निनाच्या प्रभावामुळे सप्टेंबरमध्ये जाेरदार पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. हा पाऊस ऑक्टाेबरमध्येही लांबेल, असेही भाकीत करण्यात आले आहे. याशिवाय हवामान बदलाच्या प्रभावाने मान्सूनचा काळ पुढे सरकत असून यंदा उशीरा सुरू झाल्याने ताे पुढे ऑक्टाेबरपर्यंत लांबेल, असेही मत व्यक्त केले जात आहे. मात्र ला-निनामुळे किंवा हवामान बदलाच्या प्रभावाने यंदा मान्सून लांबेल, अशा अंदाजाला सध्यातरी काही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट मत खुळे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्राच्या कोणत्या भागात सरासरीच्या कमी किंवा जास्त किंवा सरासरी इतका पाऊस पडू शकतो, याचे भाकीत १ ऑक्टोबरच्या दरम्यानच व्यवस्थित सांगता येईल.