जागतिक संत्रा महोत्सव होणार जानेवारी महिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 04:18 AM2018-12-04T04:18:43+5:302018-12-04T04:18:51+5:30
नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.
नागपूर : नागपूरच्या संत्र्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ मिळवून देणाऱ्या जागतिक संत्रा महोत्सवाचे जानेवारीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे. लोकमत समूहाच्या पुढाकाराने मागील वर्षीपासून सुरू केलेल्या या वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे.
१८ ते २१ जानेवारीदरम्यान येथील सुरेश भट सभागृहात हा महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भक्कम पाठिंब्याने विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समृद्धीत भर घालणाºया या उपक्रमाबद्दल शेतकºयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्या अनुषंगाने नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात एक बैठक घेतली. बैठकीला महापौर, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकºयांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. महोत्सवाच्या माध्यमातून शेतकºयांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री बावनकुळे यांनी दिली.
आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाºयांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महानगरपालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.