महिनाभरानंतर सापडला आत्याच्या हत्येचा आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:39 AM2019-05-18T00:39:37+5:302019-05-18T00:40:17+5:30
लग्नघरी क्षुल्लक कारणावरून स्वत:च्या आत्याची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला शोधून काढण्यात अखेर महिनाभराने नंदनवन पोलिसांना यश मिळाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नघरी क्षुल्लक कारणावरून स्वत:च्या आत्याची हत्या करून फरार झालेल्या आरोपीला शोधून काढण्यात अखेर महिनाभराने नंदनवन पोलिसांना यश मिळाले. राजेश उर्फ राज्या देवीदास पंधराम (वय ३२) असे त्याचे नाव असून तो वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील रहिवासी होय.
राज्या आणि त्याची आत्या मालाबाई कुंभरे हे दोघे नंदनवनमधील पनवशक्तीनगरातील नातेवाईकांकडे लग्नाच्या निमित्ताने आले होते. कामधंदा न करता दारूच्या नशेत गोंधळ घालतो म्हणून मालाबाईने राज्याला १३ एप्रिलला पाहुण्यांसमोर झापले होते. तो राग मनात ठेवून राज्याने १४ एप्रिलच्या सकाळी मालाबाईवर झोपेतच चाकूहल्ला करून तिची हत्या केली होती. तेव्हापासून तो फरार होता. तो गुजरातमधील अहमदाबादला पळून गेला अन् तेथे एका ढाब्यावर राहू लागला. दोन दिवसांपूर्वी तो देवळीला परत आल्याचे कळताच नंदनवन पोलिसांचा ताफा तेथे पोहचला आणि त्याने राज्याला अटक केली.
गावातही दोघांना धमकी
आत्याची हत्या करून गावात पोहचलेल्या राज्याने तेथे आत्याची बहिण तसेच अन्य एकाला हत्या करण्याची धमकी दिली होती. त्याची मनोवृत्ती लक्षात घेता तो काहीही करू शकतो, हे ध्यानात आल्याने नातेवाईकांसोबतच पोलिसांमध्येही धाकधूक होती. तो हातात आल्यामुळे नंदनवन पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला.