पाेहण्याच्या माेह जीवावर बेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:01+5:302021-06-05T04:07:01+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : व्यवस्थित पाेहता येत नसतानाही तरुण पाेहण्यासाठी जलाशयात उतरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : व्यवस्थित पाेहता येत नसतानाही तरुण पाेहण्यासाठी जलाशयात उतरला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खुर्सापार शिवारातील मधुगंगा जलाशयात गुरुवारी (दि. ३) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
अभिजित पंढरीनाथ यावलकर (२०, रा. मोहपा, ता. कळमेश्वर) असे मृताचे नाव आहे. अभिजित काेहळी (ता. कळमेश्वर) येथील आयटीआयमध्ये शिक्षण घ्यायचा. तो राेज मित्रांसाेबत खुर्सापार शिवारातील मधुगंगा जलाशयाच्या परिसरात फिरायला जायचा. शिवाय, सर्वजण त्या जलाशयात पाेहायचे. त्याला मात्र व्यवस्थित पाेहता येत नव्हते. गुरुवारी सायंकाळी मित्र न आल्याने तो एकटाच फिरायला गेला हाेता. त्यातच तो एकटाच पाेहायला पाण्यात उतरला. पाेहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खाेल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खात बुडाला.
त्यावेळी परिसरात कुणीही नसल्याने ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. त्यामुळे कुणीही त्याच्या मदतीलाही गेले नाही. काही वेळाने त्याचे मित्र या परिसरात आले असता, त्यांना अभिजितचे कपडे व चपला जलाशयाच्या काठावर आढळून आल्या. मात्र, तो कुठेही दिसत नव्हता. शंका आल्याने त्यांनी लगेच त्याचा शाेध घ्यायला सुरुवात केली. त्यांनी लगेच त्याच्या कुटुंबीयांसह पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून त्याला पाण्यातून बाहेर काढले व कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.