या महिन्यात बघायला मिळेल उल्कावर्षावाचा अभूतपूर्व देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 10:20 AM2019-11-04T10:20:45+5:302019-11-04T10:21:47+5:30
अंतराळात घडणाऱ्या घडामोडींपैकी महत्त्वपूर्ण घडामोड या नोव्हेंबर महिन्यात खगोलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. महिन्याच्या पाच दिवस मध्यरात्रीनंतर पृथ्वीवर उल्कावर्षाव होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंतराळात घडणाऱ्या घडामोडींपैकी महत्त्वपूर्ण घडामोड या नोव्हेंबर महिन्यात खगोलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. महिन्याच्या पाच दिवस मध्यरात्रीनंतर पृथ्वीवर उल्कावर्षाव होणार आहे. यात दोन दिवस तो अधिक प्रमाणात बघावयास मिळेल. तो पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नसून साध्या डोळ्यानेही तो पाहता येणार आहे. त्यामुळे खगोलप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
रमण विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या ५ तारखेदरम्यान दरवर्षी दक्षिण टोरिड उल्कावर्षाव होतो, पण सर्वोच्च उल्का ४ व ५ नोव्हेंबरला दिसतात. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हा आकाशातील घटनाक्रम होणार आहे. केंद्राचे अभिमन्यू भेलावे आणि विलास चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ‘एकने’ या धूमकेतूच्या धुळीमुळे हा उल्कावर्षाव होतो. पृथ्वी जेव्हा या धूमकेतूच्या धुळीतून जाते तेव्हा अवकाशातील धुलीकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने ओढले जातात, मात्र पृथ्वीच्या वातावरणात येताच ते जळतात व त्यामुळे ते आपल्याला पाहता येते. प्रचलित भाषेत त्याला तारे तुटणे असेही बोलले जाते. या महिन्यात होणाºया या घडामोडीनुसार १२ नोव्हेंबरला उत्तर टोरिड उल्कावर्षाव, १६ व १७ नोव्हेंबरला लियोनिड उल्कावर्षाव आणि २२ नोव्हेंबरला मोनोसटाईड उल्कावर्षाव होणार आहे. अधिक उल्कावर्षाव पाहण्याची संधी १२ व १३ नोव्हेंबरला मिळणार आहे व तो टोरस तारासमूहात दिसेल. एकने धूमकेतू तुटून तयार झालेल्या २००४ टीजी-१० या लघु ग्रहाच्या धुळीमुळे उल्कावर्षाव होतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे नोव्हेंबर महिन्यात टोरस तारासमूहात वृषभ राशीत मध्यरात्रीनंतर फायरबाल उल्कावर्षाव पाहावयास मिळतो.
६ ते ३० नोव्हेंबर या काळात लियोनिड उल्कावर्षाव होतो व १६ व १७ नोव्हेंबरला तो अधिक प्रमाणात दिसतो. कारण पृथ्वी जास्त धुलीकण असलेल्या भागातून जाते. मध्यरात्रीनंतर सिंह राशीत तारासमूहात उल्कावर्षाव पाहता येणार आहे. १५ ते २५ नोव्हेंबरदरम्यान मोनोसेटाईड उल्कावर्षाव कर्क राशीजवळ या तारासमूहात दिसणार आहे. सर्वाधिक उल्का २२ नोव्हेंबरला दिसतील. संपूर्ण नोव्हेंबर महिना उल्कावर्षावाचा महिना असल्याने खगोलीय घडामोडीतून ताऱ्यांचा वर्षाव पाहण्याची पर्वणी खगोलप्रेमींसाठी आहे.
उल्का म्हणजे थंड झालेले खडकच
अवकाशात झालेल्या प्रचंड स्फोटांमुळे ग्रहांची निर्मिती झाली आहे. यातील आकाराने मोठे असलेले ग्रह व उपग्रह म्हणून ओळखले जातात. त्यापेक्षा लहान आकाराचे असलेले कण ताºयासमान भासतात. या तारकांना विशिष्ट आकार असल्यासारखे जाणवते व या आकारावरून त्या तारासमूहाच्या राशी ठरविल्या जातात. सध्याचा उल्कावर्षाव सिंह व वृषभ राशीमधून होणार आहे. हे कण पृथ्वीच्या कक्षेत आले की गुरुत्व शक्तीने ओढले जातात. मात्र वातावरणात येताच ते जळतात. त्यामुळे ते चमकत पडताना दिसतात. यालाच उल्कावर्षाव म्हणतात.
- अभिमन्यू भेलावे, रमण विज्ञान केंद्र
ही घटना विशिष्ट वेळेत होणारी घटना नाही. ती रॅँडमली होते आणि बहुतेक उल्कावर्षाव मध्यरात्रीनंतरच होतो. शिवाय ते समूहाने होतील असे नाही. एक-दोन किंवा त्यापेक्षा अधिक आणि ते पाहण्यासाठी बराच पेशन्स ठेवावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था करण्याची शक्यता नाही. खगोलशास्त्राच्या अभ्यासकांसाठी व खगोलप्रेमींसाठी ही महत्त्वाची घटना आहे, त्यामुळे त्यांचे लक्ष राहणारच आहे. मात्र आम्ही रमण केंद्रात येणाºया विद्यार्थ्यांना या घडामोडीबाबत माहिती देत आहोत.
- विलास चौधरी, रमण विज्ञान केंद्र.