नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमआरआय’ साठी महिनाभराचे वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 10:25 AM2018-01-29T10:25:25+5:302018-01-29T10:26:03+5:30

नेहमीच दुखणाऱ्या गुडघ्याच्या निदानासाठी डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले, परंतु नागपूर मेडिकलच्या क्ष-किरण विभागाने या तपासणीसाठी तब्बल एक महिन्यानंतरची तारीख दिली.

Monthly Waiting for 'MRI' in Nagpur Medical College | नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमआरआय’ साठी महिनाभराचे वेटिंग

नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ‘एमआरआय’ साठी महिनाभराचे वेटिंग

Next
ठळक मुद्देकसे होतील तातडीने उपचार ?

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नेहमीच दुखणाऱ्या गुडघ्याच्या निदानासाठी डॉक्टरांनी ‘एमआरआय’ करण्यास सांगितले, परंतु मेडिकलच्या क्ष-किरण विभागाने या तपासणीसाठी तब्बल एक महिन्यानंतरची तारीख दिली. यामुळे डॉक्टरही उपचार करण्यास हतबल झाले. गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण असलेल्या मेडिकलमध्येच रोगाच्या निदानासाठी उशीर होत असेल तर तातडीने उपचार होणार कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एकीकडे अद्ययावत यंत्रणा व विविध विभाग उघडले जात असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. दोन हजाराची ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) आज तीन हजारावर गेली आहे. परंतु आहे त्या सोयींवर मेडिकलचा डोलारा उभा असल्याने रुग्णसेवा अडचणीत येत आहे. दुसरीकडे नवनवे आजार, आजाराची गुंतागुंत यामुळे अद्ययावत यंत्रणेचा वापर होत आहे. विशेष म्हणजे, आता प्रत्येक मोठ्या रुग्णालयात ‘एमआरआय’ महत्त्वाचे झाले आहे. असे असताना विदर्भात केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) हे उपकरण उपलब्ध आहे. परिणामी, या उपकरणावर रुग्णांचा भार वाढला आहे. यातही २०-२५ एमआरआय रोज होत आहेत. मात्र त्यानंतरही प्रतीक्षा यादी लांबत चालली आहे. सध्या महिनाभराची तर कुणाला दीड महिन्यापर्यंतची तारीख दिली जात आहे.

विनंती करूनही नाही मिळाली जवळची तारीख
गुडघ्याच्या दुखण्यावर उपचारासाठी एका रुग्णाने २२ जानेवारी रोजी मेडिकल गाठले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ‘एमआरआय’ करण्याचा सल्ला दिला. क्ष-किरण विभागातील परिचारिकेने त्यांच्या केसपेपरवर एक महिन्यानंतरची म्हणजे २२ फेब्रुवारीची तारीख दिली. त्या रुग्णाने दुखणे सहन होत नसल्याचे सांगून जवळची तारीख देण्याची विनंती केली. यावर परिचारिकेने प्रत्येकाचा हाच बहाणा असल्याचे सांगत आणि अर्धा तास उशीर केल्यास दीड महिन्यानंतरची तारीख मिळेल, असे सांगून परत पाठवून दिले.

दोनच तंत्रज्ञांमुळे सायंकाळी बंद होते एमआरआय
सूत्रानुसार, रेडिओलॉजी विभागात ‘एमआरआय’ काढण्यासाठी दोनच तंत्रज्ञ आहेत. यामुळे सकाळ व दुपार या दोनच पाळीत हे उपकरण सुरू असते. सायंकाळी ७ वाजेनंतर ‘एमआरआय’ बंद केला जातो. यामुळे दोन पाळीत २०-२५ एमआरआय रोज होतात.

Web Title: Monthly Waiting for 'MRI' in Nagpur Medical College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य