वेळू आणि लाकडी खांबावर टिकले आहे स्मारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:22+5:302020-12-07T04:07:22+5:30
नागपूर : राष्ट्रीय स्तरावर संरक्षित म्हणून घोषणा झालेली ओल्ड हायकोर्ट बिल्डिंगचे संरक्षण आता वेळू, लाकडी खांबांच्या आधारे होत आहे. ...
नागपूर : राष्ट्रीय स्तरावर संरक्षित म्हणून घोषणा झालेली ओल्ड हायकोर्ट बिल्डिंगचे संरक्षण आता वेळू, लाकडी खांबांच्या आधारे होत आहे. केंद्र सरकारचे विभाग आणि याच इमारतीत बरीच वर्षे आपले कार्यालय याच इमारतीत संचालित केलेल्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण कार्यालयानेही (एएसआय) या इमारतीच्या डागडुजीकडे लक्ष पुरविलेले नाही. एका अर्थाने संरक्षित झाल्यापासून ही इमारत नष्ट होण्यासाठीच सोडण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार राष्ट्रीय स्मारकाबाबत उदासीनतेचे धोरण व्यक्त करतो.
ब्रिटिशकाळात शहराची शान असलेली ही इमारत स्वातंत्र्यानंतर आपल्या स्वरूप आणि अस्तित्त्वाबाबत लढा देत आहे. २०१४ मध्ये एएसआयचे नागपूर सर्कल बनल्यानंतर सर्वप्रथम याच इमारतीच्या मजबूतीचे व सौंदर्यीकरणाचे काम होण्याची अपेक्षा होती. दोन वर्षापूर्वी यासाठीचा प्लॅनही तयार झाला होता. गेल्याच वर्षी इमारतीच्या देखरेखीसाठी व डागडुजीसाठी ७८ लाख रुपयाचे टेंडरही निघाले होते. परतु, कोणत्याच कंत्राटी कंपनीने या कामात रस दाखवला नाही. त्यानंतर मात्र पुन्हा टेंडर निघाले नाही.
* स्लॅब वाचविण्यासाठी लावले आहेत खांब
इमारतीच्या काही भागातील स्लॅबला वाचविण्यासाठी टेकू म्हणून लोखंडी खांब लावण्यात आले आहे तर दुसऱ्या माळ्यावरील कवेलूचे छप्पर तुटल्याने छप्परचे दुसरा भाग वाचविण्यासाठी तेथे वेळू आणि लाकडी खांबाचा आधार देण्यात आला आहे. विशेष म्हणजे देखरेखीअभावी सहा महिन्यापूर्वी पावसामुळे इमारतीच्या पुढील भागाच्या पोर्चचा एक भाग कोसळला होता.
........