पतंगाचा शौक जीवावर बेतला
By Admin | Published: January 15, 2016 03:28 AM2016-01-15T03:28:54+5:302016-01-15T03:28:54+5:30
डीपीला चिकटून मुलगा गंभीर : लोकांची बघ्याची भूमिका, सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता
डीपीला चिकटून मुलगा गंभीर : लोकांची बघ्याची भूमिका, सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता
नागपूर : पतंग पकडण्याच्या नादात १४ वर्षीय मुलगा इलेक्ट्रिक डीपीतील खुल्या वायरच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाला. ही घटना कामठी रोड, पीडब्ल्यूडी कॉलेजसमोर गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.
करण साखरे असे मुलाचे नाव असून, तो पिवळी नदी परिसरातील रहिवासी आहे. तो आठव्या वर्गात शिकतो. प्राप्त माहितीनुसार, किशोर पतंग पकडण्यासाठी धावत होता. यादरम्यान पतंगाचा मांजा डीपीजवळून जात होता. त्याला पकडण्यासाठी किशोरने हात पुढे केला आणि वायरच्या संपर्कात आला. वायरमधील वीजप्रवाहामुळे किशोरचा चेहरा अणि हाताला दुखापत झाली. तो डीपीसमोरच जखमी अवस्थेत जमिनीवर पडला. त्याला मदत करण्याऐवजी काही तरुणांनी घटनेचे मोबाईलद्वारे रेकॉर्डिंग करण्यातच धन्यता मानली. यादरम्यान लगतच्या विदर्भ डिस्टीलर कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाला बाजूला करून त्याच्यावर प्रथमोपचार केले. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या वर्षा श्यामकुळे आणि सविता राऊत यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मुलाला मदत केली. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. रितेश सोमकुंवरच्या मदतीने मुलाला उचलून आॅटोमोटिव्ह चौकातील एका खासगी रुग्णालयात भरती केले. सध्या मुलाची स्थिती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. किशोरचे वडील अजय साखरे रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. मुलाच्या उपचारार्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी सहा हजार रुपये गोळा करून रुग्णालयात जमा केले. सूचनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खरे रुग्णालयात पोहोचले. विस्तृत माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
तरुण व्हिडिओ काढण्यात गर्क
दुर्घटनेनंतर काही तरुण अणि लोकांनी मुलाला मदत करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. काही तरुण घटनेचे मोबाईलने व्हिडिओ काढण्यात गर्क होते. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी गंभीर मुलाला रुग्णालयात भरती केले.