आकाशात चंद्रासाेबत गुरु व शुक्राची युती; तिन्ही प्रतिमा एका रेषेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 12:26 PM2023-02-24T12:26:00+5:302023-02-24T12:26:00+5:30
चंद्र सर्वात मोठा ग्रह गुरु आणि शुक्र या तिघांची महाआघाडी सध्या अभ्यासकांसह सामान्य नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
नागपूर : आकाशातील ग्रहताऱ्यांच्या घडामाेडींचे कुतूहल असलेल्या अवकाश निरीक्षक, खगाेलप्रेमींसाठी सध्या अतिशय सुंदर संधी आहे. गेल्या काही महिन्यात चार प्रमुख ग्रह पृथ्वीच्या जवळून सूर्याकडे मार्गक्रमण करीत आहेत. त्यातील गुरु आणि शुक्र ग्रहाची चंद्रासाेबत युती झाली आहे आणि ताे उघड्या डाेळ्यांनी पाहण्याचा खास याेग जुळून आला आहे.
सूर्याभाेवती लंबगाेलाकार गतीने परिक्रमा करताना ग्रह काही वेळी एकमेकांजवळून मार्गक्रमण करीत असतात. सध्या गुरु, शुक्र, शनि आणि मंगळ हे ग्रह पृथ्वीजवळून जात आहेत. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापासून अवकाशात ही स्थिती सुरू आहे. नुकतेच रमन विज्ञान केंद्राने पाच दिवस टेलिस्काेपने हे ग्रह पाहण्याची व्यवस्था केली हाेती. मात्र सध्या दाेन ग्रह उघड्या डाेळ्यांनी स्पष्ट दिसत आहेत.
दाेन्ही ग्रह आणि चंद्राची प्रतिमा एका रेषेत दिसून येत आहे. खाली शुक्र, त्यावर गुरु आणि सर्वात वर चंद्राची काेर दिसून येत आहे. त्यावर मंगळ आहे; पण त्याचे अंतर अधिक असल्याने डाेळ्याने दिसणे अशक्य आहे. किमान मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही स्थिती दिसणार आहे. त्यानंतर मात्र हे ग्रह सूर्याकडे सरकतील. हा याेग पुढच्या वर्षी पुन्हा बघायला मिळेल.