कवी राजा बढे यांच्या स्मरणांचे चांदणे

By admin | Published: July 27, 2014 01:26 AM2014-07-27T01:26:13+5:302014-07-27T01:26:13+5:30

नागपूर-विदर्भाचे भूषण असलेले कविवर्य राजा बढे यांनी महाराष्ट्र आणि विदर्भगीत लिहिले. या प्रदेशाची एकसंघता त्यांनी कृष्णा-कोयनेच्या स्वरूपात मांडली. पण कवी राजा बढे मात्र उपेक्षित राहिले.

The moonlight of the memories of the poet, Raja Budse | कवी राजा बढे यांच्या स्मरणांचे चांदणे

कवी राजा बढे यांच्या स्मरणांचे चांदणे

Next

दुर्मिळ आठवणींना उजाळा : बढे यांच्या निवडक गीतांचा कार्यक्रम
नागपूर : नागपूर-विदर्भाचे भूषण असलेले कविवर्य राजा बढे यांनी महाराष्ट्र आणि विदर्भगीत लिहिले. या प्रदेशाची एकसंघता त्यांनी कृष्णा-कोयनेच्या स्वरूपात मांडली. पण कवी राजा बढे मात्र उपेक्षित राहिले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या महान कवीचे ऋण व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी नागपूरकरांनी पुढाकार घेतला. कविवर्य राजा बढे जन्मशताब्दी समारोह समिती स्थापन करण्यात आली आणि शनिवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दिग्गज मान्यवरांनी राजा बढे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. कार्यक्रमात कवी राजा बढे यांच्या स्मरणांचे चांदणे शिंपले गेले. त्यांच्या अनेक आठवणींच्या हिंदोळ्यावर हा कार्यक्रम झुलत राहिला, आनंद देत राहिला.
कविवर्य राजा बढे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कवी राजा बढे जन्मशताब्दी समारोह समिती आणि राजकारणे मीडिया वेव्हस् प्रा.लि. यांच्या सौजन्याने वसंतराव देशपांडे सभागृहात ‘चांदणे शिंपित जाशी...’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, कवी संदीप खरे, महापौर आणि आ. अनिल सोले, अजय राजकारणे आणि कविवर्य राजा बढे यांचे बंधू बबन बढे उपस्थित होते. कार्यक्रमात अतिथींच्या हस्ते कवी राजा बढे यांच्या कर्तृत्वाचा आलेख घेणाऱ्या संकेतस्थळाचे उद्घाटन आणि त्यांच्या गीतांच्या ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले.
नितीन गडकरी म्हणाले, बढे माझ्या वडिलांचे ते मित्र होते. ते हयात असताना माझ्या घरात नेहमीच त्यांची प्रशंसा मी ऐकली आहे. त्यांच्याशी एकदा मुंबईत भेटही झाली. राजा बढे, ग्रेस, सुरेश भट यांचे साहित्याच्या इतिहासतील कार्य फार मोठे आहे. आज ते नसले तरी त्यांच्या रचना रसिकांच्या मनात जिवंत आहेत. सुरेश भटांच्या नावाने रेशीमबाग येथे सभागृहाचे काम सुरू आहे. १८०० आसनक्षमतेचे हे सभागृह मनपाने लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले. या सभागृहाच्या उद्घाटनाला लतादीदी, आशा भोसले आणि पं. हृदयनाथ मंगेशकर यांना बोलाविणार आहे,
आशाताई खाडिलकर म्हणाल्या, ‘धाडीला राम का तिने वनी’ या नाटकात मला सीतेची भूमिका करण्याची गळ बढे यांनी घातली. या नाटकाचे संगीत दिग्दर्शन पं. जितेंद्र अभिषेकी करीत होते. त्यावेळी बढे त्यांना एकेक गीत द्यायचे आणि पं. अभिषेकी त्याला चाल लावायचे. यातील ‘घाई नको...’ या नाट्यपदाला तर त्यांनी दोन मिनिटात चाल लावून मला शिकविले. ‘लेवू कशी वल्कला...’ हे गीत लोकप्रिय आहे. बढे यांच्या गीतात सहजता, साधेपणा आणि संस्काराचे आरोपण आहे, असे त्या म्हणाल्या.
संदीप खरे म्हणाले, ग्रेस, भट, बढे, सावरकर अशी नावे घेताना पुरंदर, पन्हाळगड अशी नावे घेतल्यासारखी ही माणसे मोठी आहे. विदर्भाच्या रसिकतेला शोभणारा हा कार्यक्रम आहे. राजा बढे यांच्या नावाने एखादा पुरस्कार जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी नितीन गडकरींना केले. याप्रसंगी त्यांनी राजा बढे यांची एक कविता सादर करून त्याची सार्वत्रिकता सिद्ध केली. अनिल सोले म्हणाले, सी. पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालयासमोरील चौकाला कवी राजा बढे चौक असे नाव देण्याचे मनपाने ठरविले आहे. याशिवाय मनपाच्या ग्रंथालयातील दालनाला राजा बढे यांचे नाव देण्याचा विचार आहे. याप्रसंगी अनंत नगरकर, चारु जिचकार, गोविंद गडकरी, निखिल पिंपळगावकर, सुधीर पाटणकर या ध्वनिचित्रफितीत सहभाग देण्याऱ्या कलावंताचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन रेणुका देशकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीच्या अजय पाटील, आशुतोष शेवाळकर, समीर मेघे, नितीन कुळकर्णी, श्याम पेठकर यांनी परिश्रम घेतले. यानंतर बढे यांच्या निवडक गीतांचे सांगितीक सादरीकरण करण्यात आले. यात मंजिरी वैद्य, श्र्ुती चौधरी, गुणवंत थोरात, अनुजा मेंघळ, सुरभी ढोमणे यांनी सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले. (प्रतिनिधी)
स्वा. सावरकरांसाठी नोकरीचा त्याग : पं. मंगेशकर
राजा बढे यांना मी भाऊ म्हणायचो. आमच्या कुटुंबाशी त्यांचे जवळचे संबंध. आठवड्यातून चारवेळा तरी आमच्या घरीच त्यांचे भोजन असायचे. भाऊंनी मला तेथे काही काळासाठी कॉन्ट्रॅक्टवर लावून दिले. भाऊंनी मला ‘चांदणे शिंपीत जाशी...’ हे गीत दिले आणि १९५६ साली ते मी १५ मिनिटात संगीतबद्ध केले. आजही हे गीत ताजे आहे. पण राजाभाऊंचे माझ्यामुळे नुकसान झाले. राजाभाऊ हिंदुत्ववादी आणि सावरकरभक्त. सावरकरांच्या जयोस्तुते आणि ने मजसी ने... या गीतांना मी संगीतबद्ध केले. ही चाल सावरकरांनाही आवडली. पण आकाशवाणीवर मात्र मला आणि भाऊंना कारणे द्या, अशी सूचना मिळाली. त्यात आम्हा दोघांचीही नोकरी गेली. पण भाऊंना मात्र याची कल्पना होती. त्यांनी ते खूप सहजपणे घेतले, अशी आठवण पं. मंगेशकरांनी सांगितली.

Web Title: The moonlight of the memories of the poet, Raja Budse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.