नागपूर विद्यापीठातील अत्याधुनिक ‘जिम’ भाडेतत्त्वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 10:06 PM2018-08-29T22:06:55+5:302018-08-29T22:20:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र विद्यापीठात ही व्यायामशाळा चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करुन ती भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप उपस्थित केले असून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अत्याधुनिक व्यायामशाळा उभारण्यात आली होती. मात्र विद्यापीठात ही व्यायामशाळा चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळ नसल्याचे कारण पुढे करुन ती भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी आक्षेप उपस्थित केले असून फेरनिविदा प्रक्रिया राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागात अत्याधुनिक व्यायामशाळा आहे. या व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी संबंधित व्यायामशाळा आम्हीच चालवू, असा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला होता. मात्र मनुष्यबळ नसल्याचे कारण देत ही व्यायामशाळा भाडेतत्त्वावर बाहेरील व्यक्तीला चालवायला देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला. विशेष म्हणजे ३१ मे २०१८ रोजी कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ रोजी संबंधित करारनाम्याला विशेषाधिकारात मान्यता दिली. करारनाम्यानुसार प्रमोद वानखेडे यांना ही व्यायामशाळा चालविण्यासाठी देण्यात आली.
या करारानाम्याला मान्यता मिळावी यासाठी हा विषय मंगळवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मांडण्यात आला. मात्र काही व्यवस्थापन परिषद सदस्यांनी या करारनाम्यावर प्रश्न उपस्थित केले. व्यायायशाळा भाडेतत्त्वावर देण्याअगोदर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती का असे विचारत कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र याबाबतची कागदपत्रे प्रशासनातर्फे पुरविण्यात आली नव्हती. त्यामुळे अखेर हा विषय गुरुवारी चर्चेला यावा, असे ठरले. विद्यापीठाने समिती गठित करुन अद्ययावत व नामांकित व्यायामशाळा चालकांना निविदा प्रक्रियेद्वारे आमंत्रित करावे. त्यातून मिळणारा महसूल विद्यार्थी कल्याण व क्रीडा सुविधा विकासासाठी वापरण्यात यावा, अशी सूचना यावेळी विष्णू चांगदे यांनी केली.
विशेषाधिकाराचा उपयोग का ?
साधारणत: विद्यार्थी हिताच्या व प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या बाबींसाठी कुलगुरूंकडून विशेषाधिकाराचा वापर करण्यात येतो. मात्र व्यायामशाळेच्या करारनाम्याला मान्यता देणे ही अत्यावश्यक बाब खरोखरच होऊ शकते का, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उपस्थित होत आहे.
सर्व विद्यार्थ्यांना प्राधान्य नाही
दरम्यान, विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यायामशाळेत सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक दिली जात नाही. सोबतच ही व्यायामशाळा चालविणाऱ्यांनी स्वत:च्या नावाचे फलकदेखील तेथे लावले होते. याबाबत अधिकाऱ्यांनी हटकल्यानंतर ते फलक काढण्यात आले. यासंदर्भात प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी यांना विचारणा केली असता सर्व विद्यार्थ्यांना कमी दरात व्यायामशाळा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक कागदपत्रे गुरुवारी व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करण्यात येतील, असेदेखील त्यांनी सांगितले.