नागपूर लाईव्ह सिटी अॅपवर १० हजाराहून अधिक तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 01:16 AM2020-07-01T01:16:20+5:302020-07-01T01:17:37+5:30
नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले आहे. या अॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून ९,३०२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकांना महापालिकेच्या कामासाठी कार्यालयात येण्याची गरज भासू नये म्हणून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी अॅप’ तयार केले आहे. या अॅपला आजपर्यंत जवळपास २३ हजार नागपूरकरांनी डाऊनलोड केले आहे. यावर १०,२४८ तक्रारी प्राप्त झाल्या असून ९,३०२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
प्राप्त तक्रारीपैकी मात्र ८०० प्रलंबित आहेत आणि १४६ तक्रारी नागरिकांकडून पुन्हा उघडण्यात आल्या आहे. नागरिकांनी सिवर लाईन, कचरा, रस्ते निर्माण, पथदिवे, मोकाट कुत्रे, रस्त्यावरील अतिक्रमणे याबाबत तक्रारी नोंदविल्या आहेत.
तक्रारींवर माहितीही संबंधित नागरिकांना अॅपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मूलभूत सोईसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर अॅपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर अॅप सध्या अॅन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http:// www .nmcnagpur. gov .in / grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या अॅपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी अॅपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.
विशेष म्हणजे अॅपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून याचा ते वेळोवेळी आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर अॅपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाºयाला कारणे दाखवा नोटीस जाते. हे अॅप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.