नागपुरातील १५ मीटरहून अधिक उंच व जुन्या इमारतींना ‘फायर अलर्ट ’यंत्रणा बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 07:30 PM2017-12-23T19:30:48+5:302017-12-23T19:32:23+5:30
शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शहरातील बहुसंख्य नवीन उंच इमारतीत ‘फायर अलर्ट’ यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारतीत ही यंत्रणा नाही. दुर्घटना होण्याची शक्यता विचारात घेता आता अशा इमारतींनाही फायर अलर्ट यंत्रणा लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घेतला आहे.
महापालिके च्या अग्निशमन विभागाकडे ‘फायर अलर्ट’ हॉटलाईन सिक्युरिटी यंत्रणा आहे. परंतु जुन्या इमारती या यंत्रणेशी जोडलेल्या नाही. त्यामुळे आता १५ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या जुन्या व नवीन इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रस्तावाला अग्निशमन व विद्युत समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
फायर सेफ्टी अॅक्टनुसार ज्या इमारतींची उंची १५ मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त उंच आहे तसेच ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा अधिक आहे अशा सर्व इमारतींना अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. आता त्यात फायर अलर्ट हॉटलाईन सिक्युरिटी सिस्टीमचा समावेश करण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे त्या इमारतींची सर्व माहिती अग्निशमन विभागाकडे उपलब्ध असणार आहे. टाकीतील पाणी, अग्निशमन सेवा याचाही त्यात समावेश असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. यावेळी सभापती संजय बालपांडे, उपसभापती प्रमोद चिखले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर व सदस्य उपस्थित होते.
अग्निशमन विभागामार्फ त शहरातील विहीर सफाईचे काम केले जाते. यावर लाखौं रुपयांचा खर्च विभागाला करावा लागतो. ही जबाबदारी आरोग्य विभागावर सोपविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सरकारी विहिरी या मोफत साफ करण्यात याव्यात. खासगी विहिरींकरिता नाममात्र शुल्क आकारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
त्रिमूर्ती नगरात नवीन स्थानक
त्रिमूर्ती नगरात नव्याने अग्निशमन स्थानकाची इमारत उभारली जात आहे. या इमारतीचे बांधकाम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यासोबतच वाठोडा, गंजीपेठ येथील स्थानकांच्या इमारतीचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.