एसटीने जोडलेत तब्बल १९ लाख नवे प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 01:53 AM2018-04-22T01:53:38+5:302018-04-22T01:53:48+5:30
एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
दयानंद पाईकराव
नागपूर : एसटीची बस म्हणजे अस्वच्छ, खडखड करणारा लाल डब्बा, तुटलेल्या सीट असाच काहीसा समज सर्वसामान्यांत आहे. परंतु एसटी महामंडळाने आपली प्रतिमा बदलविण्यासाठी अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याची अंमलबजावणीही जोरात सुरू आहे. खासगी वाहतुकीला तोंड देण्यासाठी एसटीने कंबर कसली आहे. मागील वर्षभरात नागपूर विभागात तब्बल १९ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ झाल्याची नोंद असून, त्यापोटी नागपूर विभागाचे उत्पन्न तब्बल ५ कोटी ७७ लाख रुपयांनी वाढले आहे.
खासगी प्रवासी वाहतुकीच्या बसेसमध्ये अधिकाधिक सुविधा मिळत असल्यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळत होते. परंतु स्पर्धेच्या युगात आपण मागे राहू नये यासाठी एसटी महामंडळाने आत्मचिंतन करून प्रवासी आपल्याकडे आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षभरात एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी अनेक उपक्रम राबविले. यात नागपूर विभागात ११ मार्गावर दर अर्ध्या तासाने शटल सेवा, डिसेंबर २०१७ पासून वातानुकूलित शिवशाही बसेस, नॉन स्टॉप बसेसची सुविधाही प्रवाशांना उपलब्ध करून दिली. याचाच परिणाम म्हणून तब्बल १९ लाख ६ हजार नव्या प्रवाशांनी एसटीवर आपला विश्वास दाखवून एसटीने प्रवास केल्याची माहिती महामंडळाने दिलेल्या आकडेवारीवरून पुढे आली आहे. २०१६-१७ या वर्षी ६ कोटी ३५ लाख २५ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला होता, तर २०१७-१८ या वर्षी ६ कोटी ५४ लाख ३४ हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केल्याची नोंद झाली आहे. यात एसटीच्या नागपूर विभागाच्या उत्पन्नात ४.७८ टक्के वाढ झाली आहे. एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने मारलेल्या या बाजीसाठी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाने एका पत्राद्वारे नागपूर विभागाचे अभिनंदन केले आहे. एसटीच्या नागपूर विभागाने १९ लाख नवे प्रवासी जोडले हे खरे आहे. परंतु प्रवाशांना सातत्याने चांगली सेवा पुरविण्याची आणि जोडल्या गेलेले प्रवासी टिकवून ठेवण्याची जबाबदारी एसटीच्या नागपूर विभागावर येऊन ठेपली असून त्यात नागपूर विभाग कितपत यशस्वी होतो, हे येणारा काळच ठरविणार आहे.
सांघिक कामगिरीची फलश्रुती
‘एसटी महामंडळाचे नागपूर विभागातील प्रवासी १९ लाखानी वाढले. उत्पन्नही ५.७७ कोटीने वाढले. या यशामागे नागपूर विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम असून सांघिक कामगिरी केल्यामुळेच हे यश गाठता आले.’
-चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, नागपूर विभाग.