लग्नात ५० पेक्षा अधिक वऱ्हाडी; ५० हजारांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:18+5:302021-06-29T04:07:18+5:30
मनपाची चार लग्नसमारंभावर कारवाई : कोविड नियमांचे उल्लंघन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर: डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर ...
मनपाची चार लग्नसमारंभावर कारवाई : कोविड नियमांचे उल्लंघन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जुन्या नियमावलीत बदल केल्यानंतर नागपुरातही पुन्हा निर्बंध अधिक कठोर केले आहे. विवाह समारंभाला जास्तीत जास्त ५० लोकांना सहभागी होण्याला अनुमती आहे. असे असतानाही सोमवारी चार ठिकाणच्या लग्नसमारंभात १०० पेक्षा जास्त वऱ्हाडी सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हता. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन न केल्याने मनपाच्या उपद्रव शोध पथकाने ५० हजारांचा दंड वसूल केला.
धंतोली झोनमध्ये दोन तर हनुमान नगर आणि नेहरू नगर झोनमध्ये प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत असलेल्या सुयोग नगर येथील रंजना सेलिब्रेशन हॉलवर कारवाई करण्यात आली. येथे लग्नसमारंभात १०० पेक्षा अधिक वऱ्हाडी सहभागी झाले होते. अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आलेले नव्हते. सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या आदेशानुसार पथकाने लग्नसमारंभ असलेल्या कुटुंबाला आणि लॉन मालकाला प्रत्येकी १० हजार रुपये असा २० हजारांचा दंड केला. दुसरी कारवाई चिचभवन येथे मनोज बोबडे यांच्या घरी असलेल्या लग्नसमारंभावर करण्यात आली. त्यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. हनुमान नगर झोन अंतर्गत असलेल्या मारकंडे सभागृहात करण्यात आली. अभिजित पराते यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. नेहरू नगर झोन अंतर्गत कडबी चौकातील चामट सभागृहाचे मालक एकनाथ चामट यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
सोमवारी उपद्रव शोध पथकाने ७० मंगल कार्यालयांची तपासणी केली. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.