२४ तासात ८० ‘मि.मी.’हून अधिक पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 10:07 PM2018-08-21T22:07:58+5:302018-08-21T22:08:42+5:30
मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने सोमवारपासून विदर्भासह उपराजधानीत पुनरागमन केले. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. सोमवारपासून २४ तासात नागपुरात ८० ‘मि.मी.’हून अधिक पावसाची नोंद झाली. विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी चांगला पाऊस झाला. पुढील चार दिवस कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
सोमवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. त्यानंतर पहाटेपासून परत पावसाला सुरुवात झाली. विदर्भात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक १२७ ‘मि.मी.’पावसाची नोंद झाली. तर गोंदियामध्ये सर्वात कमी म्हणजे १८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. दरम्यान, पावसामुळे विदर्भातील सर्वच शहरांमधील तापमानाचा पारादेखील खाली गेला आहे. नागपुरात कमाल २५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सरासरीहून हे तापमान ५ अंशाने कमी आहे.
नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस मौदा तालुक्यात झाला. तेथे २६२.८ ‘मि.मी.’ पावसाची नोंद झाली. सोमवारपासून नागपूर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला असून धान, सोयाबीन, कापूस पिकांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. दरम्यान नागपूर जिल्ह्यातील मध्यम पाटबंधारे प्रकल्पांत क्षमतेच्या ५५.७० टक्के पाणीसाठा आहे. तर मोठ्या प्रकल्पांमध्ये क्षमतेच्या ३१ टक्के पाणीसाठा आहे.