नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:54+5:302021-05-01T04:06:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शुक्रवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार २४ तासात जिल्ह्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक होती. मागील काही दिवसात बरे झालेल्यांची सर्वाधिक संख्या नोंदविण्यात आली. मात्र मृत्यूचा आकडा कायम असून जिल्ह्यात ८८ मृत्यू नोंदविण्यात आले.
जिल्ह्यात ६ हजार ४६१ नवे बाधित आढळले. यातील ३ हजार ६४९ शहरातील भागातील होते, तर ठीक झालेल्या रुग्णांचा आकडा ७ हजार २९४ होता. यात शहरातील ४ हजार ८४७ जणांचा समावेश होता. शहर व ग्रामीण भागात प्रत्येकी ३९ जणांचा मृत्यू झाला व १० जण जिल्ह्याबाहेरील होते.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ४ लाख ७ हजार ७८७ बाधित व ७ हजार ३८८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शुक्रवारी २२ हजार ८७६ संशयितांची चाचणी झाली. यात शहरातील १८ हजार २८५ जणांचा समावेश होता.
ग्रामीणमधील प्रमाण जास्त
ग्रामीण भागात शुक्रवारी ४ हजार ५९१ जणांची चाचणी झाली. त्यातील २ हजार ८०२ पॉझिटिव्ह आढळले. मृत्यूची संख्या शहराइतकीच होती. ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण आहे.
७६ हजार सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात ७६ हजार ७०६ सक्रिय रुग्ण आहेत. यात शहरातील ४४ हजार ९१३ व ग्रामीणमधील ३१ हजार ७९३ जणांचा समावेश आहे. सरकारी व खासगी रुग्णालयात १५ हजार ३७० रुग्ण दाखल आहेत, तर ६१ हजार ३३६ रुग्ण ‘होम आयसोलेशन’मध्ये आहेत.