कोरोनापेक्षाही अधिक मृत्यू रस्ते अपघातांत - राजाभाऊ गिते
By सुमेध वाघमार | Published: February 13, 2024 07:21 PM2024-02-13T19:21:16+5:302024-02-13T19:21:43+5:30
एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात.
नागपूर: एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. हेल्मेटचा वापर न करणे, सीटबेल्ट न लावणे व अति वेगाने वाहन चालविणे या कारणांमुळे प्राणघातक अपघात होतात. कोरोनापेक्षाही जास्त मृत्यु अपघातांमुळे होत आहेत. परिणामी वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाºया घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (शहर), नागपूर (ग्रामीण) व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, नागपूर (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यामाने ‘रस्ता सुरक्षा अभियान- २०२४’चे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी या अभियानाचा समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, एसटी महामंडळाच्या आगर प्रमुख तांबे, गौतम शेंडे, डॉ. अविनाशचंद्र अग्नीहोत्री, प्रज्ञा मोदी आदी उपस्थित होत्या. संचालन किर्ती खोब्रागडे यांनी केले. प्रास्ताविक भुयार यांनी केले. रस्ता सुरक्षेला घेऊन आपण आपली मानसिकता बदलायला हवी. ‘हे चालायचचं’ ही वृत्ती सोडायला हवी. स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी मांडले. कार्यक्रमाला सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, नितीन सोळंकी, विनोद इंगळे यांच्यासह आरटीओतील अनेक वरीष्ठ अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते. किशोर हम्पीहोळी यांच्या मार्गदर्शनात रस्ता अपघातावर पथनाट्य सादर करण्यात आले.
५५ वाहन चालकांना मोतीबिंदू
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आरटीओ व माधव नेत्रालयाच्यावतीने १५ ठिकाणी ९४०० परिवहन वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. यात ५५ वाहन चालकांमध्ये मोतीबिंदूचे निदान झाले. धक्कादायक म्हणजे, तपासणीपूर्वी त्यांना या आजाराची माहितीच नव्हती. गरजू चालकांना चष्म्यांचे वाटपही करण्यात आले.