बालभारतीकडून साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 04:47 PM2021-10-14T16:47:58+5:302021-10-14T17:37:15+5:30
२०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे दुर्गम भागातील अनेक विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत शालेय पुस्तके पोहोचत नसल्याचे चित्र असताना, बालभारतीला मात्र हजारो टन पुस्तकांची विल्हेवाट लावावी लागत आहे. २०१२ सालापासून बालभारतीने(Balbharti) साडेपाच हजार टनांहून अधिक पुस्तके रद्दीत विकली. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीकडे विचारणा केली होती. २०१२ सालापासून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यास संशोधन मंडळाने किती पुस्तके रद्दीत काढली, त्यापासून किती महसूल मिळाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार एप्रिल २०१२ पासून ते मार्च २०१९ या कालावधीत चार वेळा पुस्तके रद्दीत काढली. रद्दीत काढलेल्या पुस्तकांचे एकूण वजन ५ हजार ६३३ मेट्रिक टन इतके होते, तर यापासून ६ कोटी ४० लाख २ हजार ६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला. २०१२-१३, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ या साली पुस्तके रद्दीत काढण्यात आली. २०१६-१७ मध्ये सर्वाधिक २ हजार ९८ मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विकण्यात आली.
पूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ
कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत बालभारतीला रद्दीत पुस्तके काढण्यात आल्याची कारणे, उंदीर व वाळवीमुळे खराब झालेली पुस्तके, गोदामातील एकूण पुस्तके यांचीदेखील माहिती विचारली होती. ही सर्व माहिती एकाच विषयाशी संबंधित होती. परंतु बालभारतीच्या जनमाहिती अधिकाऱ्यांनी हे सर्व विषय वेगवेगळ्या मुद्द्यांशी निगडित असल्याचे कारण देत, माहिती देण्याचे टाळले. या माहितीसाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे.