नागपूर जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक मुली-महिला ‘ॲनेमिया’ग्रस्त; ‘ओमायक्रॉन’चा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:45 AM2021-12-08T07:45:00+5:302021-12-08T07:45:01+5:30
नागपूर जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक मुली-महिला ‘ॲनेमिया’ग्रस्त असून, चार वर्षांत हे प्रमाण जास्त वाढले. याशिवाय पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण जास्त असल्याची बाब समोर आली आहे.
योगेश पांडे
नागपूर : वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आरोग्याशी संबंधित विविध समस्यादेखील वाढताना दिसून येत आहेत. नागपूर जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक मुली-महिला ‘ॲनेमिया’ग्रस्त असून, चार वर्षांत हे प्रमाण जास्त वाढले. याशिवाय पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण जास्त असल्याची बाब समोर आली आहे.
राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या पाचव्या आवृत्तीच्या अहवालातून (एनएचएफएस-५) ही धक्कादायक बाब समोर आली आहे. २०१५-१६ साली जारी झालेल्या अहवालानुसार, नागपूर जिल्ह्यात १५ ते ४९ वयोगटातील ४६.७ टक्के मुली व महिला (गर्भवती नसलेल्या) ‘ॲनेमिया’ग्रस्त होत्या. २०१९-२० मध्ये हाच आकडा ५४ टक्क्यांवर गेला. १५ ते १९ वयोगटातील ५७.९ टक्के मुलींना ‘ॲनेमिया’ असल्याची नोंद झाली तर, १५ ते ४९ वयोगटातील हीच टक्केवारी ५३.६ टक्के इतकी होती. २०१५-१६ मध्ये याच वयोगटातील ५१.२ व ४६.६ टक्के मुली व महिलांना ‘ॲनेमिया’ होता.
२१.३ टक्के महिलांना रक्तदाबाची समस्या
विविध कारणांमुळे रक्तदाब वाढण्याचे प्रमाणदेखील दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये रक्तदाबाची समस्या जास्त असल्याचे अहवालातून समोर आले. १५ किंवा अधिक वयोगटातील १८.३ टक्के पुरुषांमध्ये रक्तदाबाची (सौम्य, उच्च किंवा औषधांच्या सेवनाने नियंत्रणाचा प्रयत्न) समस्या असल्याचे स्पष्ट झाले. महिलांमध्ये हीच टक्केवारी २१.३ टक्के इतकी आहे.
खासगी इस्पितळात ४१ टक्के प्रसूती सीझेरियनद्वारे
२०१९-२० मध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रसूती या खासगी किंवा सरकारी प्रसूती केंद्रांवर झाल्या. सरकारी इस्पितळे किंवा आरोग्य केंद्रांवर प्रसूतीचा टक्का घटला आहे. २०१५-१६ मध्ये ७०.६ टक्के प्रसूती सरकारी केंद्रांवर झाल्या होत्या. २०१९-२० मध्ये हा आकडा घटून ६१.९ टक्के इतका झाला. खासगी इस्पितळातील ४१.४ टक्के प्रसूती या ‘सीझेरियन’च्या माध्यमातून झाल्या तर, सरकारी आरोग्य केंद्रांवर हीच टक्केवारी २८.९ टक्के इतकी होती.
महिलांमधील इतर समस्या
समस्या - टक्केवारी
रक्तातील साखरेचे प्रमाण (उच्च) - ६ टक्के
रक्तातील साखरेचे प्रमाण (अतिउच्च) - ३.९ टक्के
रक्तातील साखरेचे प्रमाण (उच्च-अतिउच्च-औषधांचे सेवन) - १०.७ टक्के
सौम्य रक्तदाब - १३.२ टक्के
उच्च रक्तदाब - ४.३ टक्के
रक्तदाब (सौम्य-उच्च-औषधांचे सेवन)- २१.३ टक्के