महाराष्ट्रात दहशतवाद्यांना जादा मायलेज
By admin | Published: September 25, 2015 03:37 AM2015-09-25T03:37:46+5:302015-09-25T03:37:46+5:30
दहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही.
टाळता येऊ शकतो धोका : प्रत्येकाने सतर्कता बाळगण्याची गरज
नरेश डोंगरे नागपूर
दहशतवाद हा काही एखाद्या कोड्याचे उत्तर शोधून संपविण्यासारखा विषय नव्हे. दहशतवाद्यांना कोणत्याही जाती-धर्माशी काही देणे-घेणे नाही. अशांतता, अस्वस्थता, उध्वस्तता हेच दहशतवाद्यांचे टार्गेट असते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. स्लिपर सेलच्या माध्यमातून आपली जमीन तयार करतात अन् आपले कलुषित मनसुबे यशस्वी करतात. त्यांचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेसारखी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीने सतर्कता बाळगल्यास राज्यच काय, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात कसलाही धोका होणार नाही. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल आॅपरेशन) विपीनकुमार बिहारी यांचे हे मत आहे.
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या नागपुरात घातपात किंवा जातीय दंगलीचा प्रकार घडू शकतो, असा इशारा असल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. गेल्या चार दिवसांपासून एडीजी बिहारी नागपुरात आहेत. अधिकाऱ्यांच्या बैठका घेत शहरातील वेगवेगळ्या भागांची ते पाहणी करीत असल्यामुळे पोलीस दलातही कुजबुज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रस्तुत प्रतिनिधीने गुरुवारी त्याची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. गोपनीयतेच्या अनुषंगाने अनेक बाबींवर भाष्य करण्याचे टाळत त्यांनी दहशतवाद, महाराष्ट्र आणि सुरक्षा व्यवस्थेच्या संदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा केली.
२६/ ११ ची पुनरावृत्ती होऊ शकते, असा धोका वर्तविण्यात आल्याचे वृत्त आहे. याकडे लक्ष वेधून मुंबई-महाराष्ट्रालाच दहशतवादी वेळोवेळी का टार्गेट करीत आहेत, बाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, महाराष्ट्र हे पुरोगामी, विकसित आणि लक्षवेधी राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्रात आहे. एक प्रकारे महाराष्ट्र हे देशाचे हृदय आहे. येथे काही झाले तर त्याचे पडसाद देशातच नव्हे तर जगभरात उमटतात. दहशतवाद्यांना हे माहीत आहे. त्यांना हवे असलेले ‘मायलेज’ मिळत असल्यामुळेच महाराष्ट्राकडे त्यांची नजर जास्त वाकडी आहे.
‘जनरल अलर्ट’
राज्यातील सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून जागली करीत आहे. घातपाताचा ‘जनरल अलर्ट’ आहे. मात्र, दहशतावाद्यांना कसलीही संधी मिळणार नाही, अशा उपाययोजना राज्य पोलीस दलाने केल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेच काही विपरीत घडणार नाही आणि सणोत्सव शांततेत पार पडेल, असा विश्वासही एडीजी बिहारी यांनी शेवटी व्यक्त केला.