पटना, लखनऊहून जास्त हत्या नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:11 AM2021-09-17T04:11:39+5:302021-09-17T04:11:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एरवी बिहारची राजधानी पटना व उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ ही शहरे विविध गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एरवी बिहारची राजधानी पटना व उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ ही शहरे विविध गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. परंतु राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरने हत्यांच्या बाबतीत या शहरांनादेखील मागे सोडले आहे. २०२० साली कोरोनाचे निर्बंध असूनदेखील या दोन्ही शहरांतून जास्त हत्यांची नोंद नागपुरात झाली. दुर्दैवाची बाब म्हणजे देशात लोकसंख्येच्या तुलनेत हत्येचा सर्वाधिक ३.९ इतका दर नागपुरातच नोंदविण्यात आला. शहरात वर्षभरात ९७ हत्या झाल्या व २०१८, २०१९ च्या तुलनेत ही संख्या वाढलेली दिसून आली. एनसीआरबीच्या (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो) अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
२०१८ साली नागपुरात ७२ तर २०१९ साली ९० हत्यांची नोंद झाली होती. २०२० मध्ये काही महिने लॉकडाऊन असल्यामुळे पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. मात्र तरीदेखील हत्यांची संख्या वाढली. २०१८ च्या तुलनेत २०२० मध्ये हत्येच्या घटनांमध्ये सुमारे ३५ टक्के वाढ झाली. पटना व लखनऊ या शहरांत हाच आकडा अनुक्रमे ७९ व ८१ इतका होता.
सर्वाधिक टक्केवारी नागपुरातच वाढली
२०२० मध्ये बहुतांश मोठ्या शहरांमधील हत्येच्या घटनांमध्ये २०१८ व २०१९ च्या तुलनेत घट नोंदविण्यात आली. केवळ दिल्ली (१०.८१ टक्के), इंदोर (१०.५२ टक्के), सुरत (७.४० टक्के) या शहरांत २०१८ च्या तुलनेत हत्या वाढल्या. नागपुरात मात्र हीच टक्केवारी जवळपास ३५ टक्के इतकी असून २०१८ च्या तुलनेत सर्वाधिक टक्केवारी उपराजधानीतच वाढली.
प्रेमप्रकरणातून ११ टक्के हत्या
२०२० मध्ये प्रेमप्रकरणांतून ११.३४ टक्के हत्या नोंदविण्यात आल्या, तर कौटुंबिक व आर्थिक वादातून २५.७७ टक्के हत्या झाल्या. सूड घेण्याच्या उद्देशाने २३.७१ टक्के हत्या करण्यात आल्या. ९७ घटनांमध्ये १०१ जणांची बळी गेला. एकूण मृतांमध्ये ९ महिलांचा समावेश होता. याशिवाय चार अल्पवयीन व चार ज्येष्ठ नागरिकांनादेखील जीवे मारण्यात आले.
वर्षनिहाय हत्या
वर्ष - हत्या
२०१८ - ७२
२०१९ - ९०
२०२० - ९७
हत्येचा उद्देश
उद्देश - हत्या
सूड - २३
प्रेमप्रकरण - ११
अनैतिक संबंध - ०२
मालमत्ता वाद - ०६
कौटुंबिक वाद - १०
क्षुल्लक वाद - २६
आर्थिक वाद - १५
इतर - ०३
वयोगटानुसार मृत
वयोगट - पुरुष - महिला
० ते ६ : ० : ०२
६ ते १२ : २ : ०
१२ ते १८ : ० : ०
१८ ते ३० : ३७ : ०३
३० ते ४५ : ३९ : ०२
४५ ते ६० : १० : ०२
६० हून अधिक : ०२ : ०२