दिल्लीपेक्षा नागपुरात जास्त ध्वनिप्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 10:41 AM2019-10-31T10:41:25+5:302019-10-31T10:43:16+5:30
प्रदूषणाच्या बाबतीत कायम चर्चेत राहणारी देशाची राजधानी दिल्लीला ध्वनिप्रदूषणामध्ये राज्याची उपराजधानी नागपूरने मागे टाकले आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषणाच्या बाबतीत कायम चर्चेत राहणारी देशाची राजधानी दिल्लीला ध्वनिप्रदूषणामध्ये राज्याची उपराजधानी नागपूरने मागे टाकले आहे. दिवाळीच्या काळात फोडलेल्या फटाक्यांमुळे यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान राजधानी दिल्लीत कमाल ६८.१ डेसिबल ध्वनिची नोंद करण्यात आली होती, मात्र याच काळात नागपुरात ८०.८ ते ८१ डेसिबलची नोंद करण्यात आली आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) ने तयार केलेल्या ‘नॉईज ट्रॅकर अॅप’द्वारे ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आवाजाचा मानवांसहित संपूर्ण वातावरणावर होणाऱ्या परिणामांची नोंद करण्यासाठी नीरीच्या संशोधकांनी तयार केलेले हे ‘नॉईज ट्रॅकर अॅप’ नीरीच्या ७७ व्या स्थापना दिनानिमित्त संचालक डॉ. राकेश कुमार यांच्याहस्ते सादर करण्यात आले होते. या अॅपद्वारे शहरातील काही ठराविक ठिकाणी ध्वनीची नोंद घेण्यात आली होती. यातील रामनगर चौकामध्ये अॅपद्वारे सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतापर्यंत नोंदविलेल्या आकड्यानुसार ८० ते ८१ डीबी ध्वनी नोंदविण्यात आला, जो सामान्यपेक्षा तब्बल २५ ते ३५ डीबी अधिक होता. देशात एवढ्याच ध्वनिप्रदूषणाची नोंद पश्चिम बंगालच्या सुभाष मेट्रो स्टेशन चौकात करण्यात आली. विशेष म्हणजे दिवाळीच्या काळातच यात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले आहे. साधारणत ध्वनीची सहनीय क्षमता सार्वजनिक क्षेत्रात (बाजार, चौक, रोड) ५५ डीबी तर निवासी क्षेत्रात ४५ डीबी एवढी असते. त्यास नॉईज अँबियंट लेव्हल असे संबोधले जाते. यापेक्षा अधिक ध्वनिप्रदूषण म्हणून गणले जाते. राजधानी दिल्लीत या काळात सर्वात कमी म्हणजे ६८.१ डीबी नोंदविण्यात आले. त्यामुळे आता वायुप्रदूषण वाढत असलेल्या नागपुरात ध्वनिप्रदूषणाबाबतही चिंता करण्याची वेळ आली आहे.
ध्वनिप्रदूषणासह वायुप्रदूषणाचे आकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समोर आले आहेत. वायुप्रदूषणाचा विचार केल्यास केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे दिवाळीच्या दिवशी सिव्हील लाईन्सच्या परिसरात अधिक प्रदूषित हवेची नोंद करण्यात आली. रात्री १२ वाजतानंतर एअर क्वालिटी इंडेक्स ३५३ वर पोहचला होता. देशात वायुप्रदूषणाबाबत दोन शहराची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. नीरीने ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी अॅप तयार केले आहे. आता वायुप्रदूषण योग्य रुपाने मोजण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे.
पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम
ध्वनिप्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले तर त्याचा परिणाम पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर होतो. त्यामुळे पक्ष्यांचे अंडी देण्याचे प्रमाण घटते. त्यांच्या मेंदूवरही विपरीत परिणाम होतो. ध्वनिप्रदूषण हे हृदयाच्या रुग्णांसाठीही घातक ठरणारे आहे. त्यामुळे याबाबत जागरूकता आणण्यासाठीच नॉईज ट्रॅकर अॅप तयार करण्यात आले आहे. हे अॅप नि:शुल्क डाऊनलोड केले जाऊ शकते व येथील नोंदणीच्या आधारावर नागरिक आपली तक्रारही नोंदवू शकतात. हे अॅप भारतासह कॅनडा, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, थायलंड आदी देशामध्येही डाऊनलोड केले जाऊ शकते. यामध्ये एखाद्या व्यक्तीने कुठल्याही ठिकाणचा डेटा नोंद केला असल्यास तो त्या लोकेशनमध्ये सुरक्षित होतो. यामुळे एखाद्या एजन्सीद्वारे लाखो रुपये खर्च करून ध्वनिप्रदूषणाचे आकडे जाणण्याची गरज पडणार नाही. या अॅपद्वारे ध्वनिप्रदूषणाबाबत लोकही अपडेट होतील. याच आकड्यांच्या आधारे संबंधित संस्थेकडे तक्रार नोंदविली जाऊ शकेल.
- सतीश लोखंडे, सिनियर टेक्निकल ऑफिसर, नीरी