नागपुरात एक लाखाहून अधिक नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम : कॅमेऱ्यात झाले कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 12:12 AM2020-04-24T00:12:29+5:302020-04-24T00:45:16+5:30
उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत वाहतूक तोडणारे किती लोक या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आढळून आले, तसेच किती वाहनचालकांवर मोटर वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली, हे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती अधिकाराचा अर्ज वाहतूक पोलिसांकडे वर्ग केला होता. वाहतूक पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१९ ते १६ मार्च २०२० या कालावधीत १ लाख १८ हजार ५४३ वाहनचालक कॅमेऱ्याद्वारे वाहतूक नियम तोडताना आढळून आले. या सर्व चालकांवर मोटार वाहतूक कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.