नागपुरातील एक लाखाहून अधिक झोपडपट्टीधारक दहशतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 09:06 PM2020-08-08T21:06:17+5:302020-08-08T21:09:01+5:30
पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात ४२७ झोपडपट्ट्या आहेत. यातील जवळपास २९८ नोटिफाईड झालेल्या आहेत. विशेष म्हणगजे शहरातील नाल्याच्या काठावर ५० हून अधिक झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. यात एक लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. पूर्व नागपुरातील आदर्श नगर येथील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण हटविण्यासंदर्भात मनपाच्या अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील नाल्याकाठावरील झोपडपट्टीधारक दहशतीत आहेत.
आदर्श नगर नाल्यांची काही दिवसापूर्वी संरक्षण भिंत पडली. या भिंती लगतच्या काही घरांना धोका निर्माण झाला. या नागरिकांनी स्वत:हून आपली घरे सोडण्याची तयारी दर्शवली. परंतु मनपाच्या अतिक्रमण विभागाने तीन झोपड्या पोलिसांच्या मदतीने हटविल्या, तसेच काठावरील अन्य झोपडपट्टीधारकांना अतिक्रमण घेण्यासंदर्भात नोटीस बजावली. आदर्श नगर ही झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना मनपा प्रशासनाने मालकी हक्क पट्टे वाटप केले आहे. असे असतानाही अतिक्रमण विभागाने नोटीस बजावल्याने शहरातील झोपडपट्टीधारकांत दहशतीचे वातावरण आहे.
पावसाळा आला की मनपा प्रशासनातर्फे नदी-नाले काठावरील झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात अतिक्रमण हटविणे योग्य नाही. याची जाणीव असूनही अशा स्वरूपाच्या नोटीस बजावल्या जातात.
आधी पुनर्वसन नंतर कारवाई करा
देशातील कोणताही नागरिक बेघर राहणार नाही, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. यातूनच पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले जात आहे. असे असतानाही झोपडपट्टीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर अतिक्रमण हटवा, अशी मागणी झोपडपट्टीधारकांनी केली आहे. तर प्रशासनाने ही कारवाई तात्काळ थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा अॅड. यशवंत मेश्राम यांनी दिला आहे.
कारवाईपूर्वी पुनर्वसन करा
आदर्श नगर झोपडपट्टी नोटीफाईड आहे. येथील झोपडपट्टीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले आहे. नाल्याची भिंत जीर्ण झाल्याने धोका असलेल्या घरमालकांनी स्वत:हून घरे पाडण्याची तयारी दर्शविली.परंतु मनपाच्या अधिकाऱ्यांनी धोका असलेली इमारत न पडता बाजूच्या झोपड्या पाडल्या. अन्य घरांनाही नोटीस बजावल्या. झोपडपट्टीधारकाचे पुनर्वसन न करता नोटीस बजावणे योग्य नाही. आधी पुनर्वसन करा नंतर कारवाई करा.
दुनेश्वर पेठे, गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस
मनपाची कारवाई अन्यायकारक
आदर्श नगर स्लम नोटीफाईड आहे. येथील लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप केले आहे. अशा परिस्थितीत त्यांनी केलेले बांधकाम अधिक्रमण ठरवून नोटीस बजावणे योग्य नाही मनपा प्रशासनाने आधी त्यांचे पुनर्वसन करावे नंतरच कारवाई करावी.
अॅड. यशवंत मेश्राम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे समन्वयक.
कोरोना विस्थापित करणे अयोग्य
कोरोनामुळे सर्वजण संकटात आहेत. त्यात पावसाळ्याचे दिवस आहेत.अशा परिस्थितीत झोपडपट्टीधारकांना विस्थापित करणे योग्य नाही. आधी त्यांची पुनर्वसनाची व्यवस्था करावी नंतरच प्रशासनाने कारवाई करावी.
अनिल वासनिक, संयोजक विकास मंच
कारवाई नियमानुसारच
बांधकाम नकाशा मंजूर केल्याशिवाय मालकीहक्क पट्टे वाटप करता येत नाही. झोपडपट्टीधारकांनी आधी बांधकाम मंजूर करून घेणे अपेक्षित होते. परंतु तसे केले नाही. ६०० फुटाऐवजी अनेकांनी २ हजार चौरस फूट जागेत दोन मजली घरे उभारली. आदर्श नगर नाल्याची भिंत कोसळली. बाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. उद्या एखादी दुर्घटना घडली तर यासाठी मनपालाच दोषी धरले जाईल. त्यामुळे कारवाई योग्यच आहे.
महेश मोरोणे उपायुक्त मनपा