रेल्वे रुळ ओलांडताना पाऊणशेहून अधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 11:01 PM2020-10-21T23:01:30+5:302020-10-21T23:03:16+5:30
Railway, Accidental, Death, Nagpur news रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७९ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १३१ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये तसेच प्रवास करताना नियमांचे पालन करावे याबाबत मध्य रेल्वेकडून वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र याकडे दुर्लक्ष करून दाखविण्यात येणारा हलगर्जीपणा शेकडो प्रवाशांसाठी जीवघेणा ठरला आहे. २०१९ पासून २१ महिन्यात नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे सुमारे साडेपाचशे जणांचा प्राण गेला. यात रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्यामुळे थोडेथोडके नव्हे तर ७९ लोकांचे मृत्यू झाले, तर रेल्वेमधून पडल्याने १३१ जणांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे विचारणा केली होती. जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून, शॉक लागून, खांबाला धडकून, नैसर्गिकपणे किती जणांचा मृत्यू झाला, किती जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. लोहमार्ग नागपूर अंतर्गत येणाऱ्या गोंदिया, इतवारी, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला या पोलीस ठाण्यांतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीत विविध कारणांमुळे त्यांच्या हद्दीत ५४८ जणांचा मृत्यू झाला. विजेचा धक्का लागून २ तर नैसर्गिक कारणांमुळे २८३ लोकांचा मृत्यू झाला. प्लॅटफॉर्ममधील गॅपमध्ये पडल्याने १२ जणांचा जीव गेला तर ४४ जणांनी रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली.
‘लॉकडाऊन’मुळे मृत्यूमध्ये घट
२०१९ साली नागपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांमुळे ४३३ जणांचा जीव गेला. दर महिन्याची सरासरी ही ३६ मृत्यू इतकी होती. मात्र २०२० मध्ये कोरोनाच्या कारणामुळे मार्चपासून रेल्वेगाड्यांच्या संचालनावर परिणाम झाला. सप्टेंबरपर्यंत ११५ जणांचा बळी गेला. यंदा दर महिन्याची सरासरी ही १२ मृत्यू इतकी ठरली
कारण आणि मृत्यूसंख्या
रुळ ओलांडताना ७९
रेल्वेतून पडून १३१
प्लॅटफॉर्मवर पडणे १२
विजेचा धक्का २
आत्महत्या ४४
नैसर्गिक २८३