मेपर्यंत अजून पाऊस, असाच गारवा; पारा ८.६ अंशाने घसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 11:45 AM2023-04-27T11:45:27+5:302023-04-27T11:46:08+5:30
आज उघडीप तरी वाटले नाही उन्हाचे चटके
नागपूर : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले अवकाळी पावसाचे सत्र पुढचे चार दिवस म्हणजे संपूर्ण एप्रिल महिना असेच कायम राहणार आहे. बुधवारी उघडीप दिली; पण ढगांमुळे वातावरणात गारवा हाेता. उन्हाळा असूनही सातत्याने सुरू असलेल्या पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पारा झपाट्याने खाली घसरत आहे. त्यामुळे सूर्याचे चटके वाटण्याऐवजी गारव्याची जाणीव हाेत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मे महिना येईपर्यंत असाच गारवा राहणार आहे.
२४ तासात १.५ अंशाने खाली घसरला व बुधवारी तापमान ३३.९ अंशावर खाली आले, जे सरासरीपेक्षा ८.६ अंशाने कमी आहे. रात्रीचे तापमानही २१.५ अंशावर आहे, जे सरासरीपेक्षा ४.३ अंशाने खाली आहे. तापमान सातत्याने कमी हाेत असल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून कुलर बंद करावे लागले आहेत. एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस हाेताे; पण त्या दिवसाची संख्या नगण्य असते. यावर्षी मात्र उन्हाळ्यापेक्षा पावसानेच ठाण मांडले आहे.
महिन्याचे सुरुवातीचे दिवस पावसात गेले. १० एप्रिलनंतर ऊन वाढले व पारा ४० च्यावर गेला. १९ एप्रिल राेजी ४२ अंश नाेंद झाली, जे आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान हाेय. त्यानंतर मात्र उतरती कळा लागली. विशेष म्हणजे, यावर्षी १८ ते २० दिवस ढगाळ वातावरणातच गेले आणि चार ते पाच दिवस वादळ आणि गारपीटीचा तडाखा बसला.
विजांचा कडकडाट राहणारच
यंदा एप्रिलचे तापमान ३३ अंशापर्यंत घसरणे हा दशकभराचा विक्रमच म्हणावा लागेल. कारण दशकभरात एप्रिलचे ऊन दिलासादायक कधी वाटले नाही. २०१६ ते २०१९ आणि २०२२ मध्ये पारा ४५ अंशापर्यंत पाेहाेचला हाेता. २०१३ पासून उरलेल्या वर्षात ताे ४३ व ४४ अंशाच्या सरासरीत हाेता. त्यामुळे यंदाचा एप्रिल महिना नागपूरकरांसाठी दिलासादायक ठरला. दरम्यान, हवामान विभागाने ३० एप्रिलपर्यंत जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे व त्यापुढचे दाेन दिवस ढगाळ वातावरण व विजांचा कडकडाट हाेण्याचा अंदाज आहे.