दुहेरी खुनात आणखी दाेघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:21+5:302020-12-04T04:27:21+5:30
कुही : डाेंगरगाव शिवारात करण्यात आलेल्या कुणाल सुरेश चरडे (२९) व सुशील बावणे (२७) दाेघेही रा. दिघाेरी, नागपूर यांचा ...
कुही : डाेंगरगाव शिवारात करण्यात आलेल्या कुणाल सुरेश चरडे (२९) व सुशील बावणे (२७) दाेघेही रा. दिघाेरी, नागपूर यांचा १६ नाेव्हेंबरच्या रात्री खून करण्यात आला हाेता. या दुहेरी खुनात स्थानिक गुन्हे शाखेने घटनेच्या काही तासात चाैघांना अटक केली हाेती. त्यानंतर बुधवारी (दि. २) आणखी दाेघांना अटक केल्याने या हत्याकांडातील आराेपींची संख्या सहा झाली आहे. हे हत्याकांड टाेळीयुद्धातील मतभेदातून झाल्याची कबुली आराेपींनी दिली आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांनी दिली.
या हत्याकांडात सुरुवातीला राहुल श्रावण लांबट (२७, रा. भांडेवाडी, नागपूर) व निशांत प्रशांत शाहाकर (२३, रा. खरबी राेड, नागपूर), जागेश्वर ऊर्फ बाहू संताेष दुधनकर (३३, रा. नरसाळा, नागपूर) व यश युवराज बागडे (१९, रा. दिघाेरी, नागपूर) या चाैघांना तर बुधवारी याेगेश विकास भिमटे (२१, रा. नरसाळा, नागपूर) व वैभव विनायक कुकडे (२३, रा. दिघाेरी, नागपूर) या दाेघांना अटक केली.
मृत व आराेपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यात वर्चस्वावरून मतभेद निर्माण झाले हाेते. आराेपींनी या दाेघांचे अपहरण केले आणि डाेंगरगाव शिवारात दाेघांचीही धारदार शस्त्र व सिमेंटच्या पाेलने वार करून हत्या केली. आधी अटक केलेले आराेपी व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्य दाेन आराेपीस नागपूर शहरातून ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
---
तीन दिवसांचा ‘पीसीआर’
नव्याने आटक केलेल्या दाेन्ही आराेपींना गुरुवारी (दि. ३) कुही येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची अर्थात शनिवार (दि. ५)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे. या घटनेत आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता अनिल जिट्टावार यांनी व्यक्त केली.