३२ पेक्षा अधिक प्रजातींचे स्थलांतरित पक्षी पेंचमध्ये मुक्कामाला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 04:00 PM2023-02-11T16:00:37+5:302023-02-11T16:00:55+5:30
नवेगाव खैरी, वाघोली, तोतलाडोह तलावांचेही पाहुण्या पक्ष्यांना आकर्षण
गोपाळकृष्ण मांडवकर
नागपूर : वनराई आणि जलाशयाने समृद्ध असलेल्या पेंचमध्ये दरवर्षी ८९ प्रजातींचे स्थलांतरीत पक्षी येत असतात. यंदाही ३२ पेक्षा अधिक पाहुणे पक्षी येथे पोहोचले असून त्यांच्या किलबिलाटाने येथील जलाशय आणि जंगल गजबजले आहे. ऑक्टोबरपासून येथे आलेल्या या पक्ष्यांचा पुन्हा पुढील किमान पंधरा दिवस येथे मुक्काम राहण्याची शक्यता असून नवेगाव खैरी, वाघोली आणि तोतलाडोह आदी तलावांवरही या पाहुण्यांचा मोठा वावर आहे.
उत्तरेकडील हिवाळ्यात कडाक्याची थंडी आणि अन्नाच्या टंचाईपासून वाचण्यासाठी पक्षी हिवाळ्याच्या हंगामात दक्षिणेकडील उबदार ठिकाणी स्थलांतर करतात. पेंचमध्ये पक्ष्यांचे हिवाळी स्थलांतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होते. यंदा हिमालयातील ब्लॅक रेडस्टार्ट, वॉरब्लर्स यांच्यापाठोपाठ वॅगटेल, स्निप्स, सँडपायपर्स, पोचार्ड्स, बार हेडेड गीज, रुडी शेलडक्स, गार्गेनी, नॉर्दर्न पिंटेल, शोव्हेलर्स, गडवाल, नॉब बिल्ड डक्स, हॉक्स, हॅरियर्स, ऑस्प्रे या पक्ष्यांचेही यंदा आगमन झाले आहे. यात पाणपक्ष्यांची संख्या अधिक आहे.
नॉर्दर्न पिंटेल आणि रेड क्रेस्टेड पोचार्डचे प्रमाण अधिक
येथे आलेल्या पक्ष्यांमध्ये नॉर्दर्न पिंटेल आणि रेड क्रेस्टेड पोचार्ड यांचे प्रमाण अधिक आहे. ते पक्षी समूहाने स्थलांतर करतात, यामुळे तलावांमध्ये या पक्ष्यांची घनता सर्वाधिक आहे. ते हिवाळ्याच्या शेवटपर्यंत राहतात आणि मार्चच्या मध्यापर्यंत प्रवासाला निघतात.
अन्य तलावांचेही आकर्षण
बहुतेक स्थलांतरित पक्षी नवेगाव खैरी, वाघोली, तोतलाडोह आणि वांद्रे तलावांवरही विसावले आहेत. तिथे असलेले भरपूर खाद्य, नसलेला मानवी हस्तक्षेप, भक्षकांचे नसलेले भय, पाण्याची गुणवत्ता, सभोवतालची झाडी ही यामागील कारणे आहेत. पिपरिया, चारगाव, वाघोली आदी तलावांमध्ये त्यांना खाण्यासाठी भरपूर जलचर आणि पाणवनस्पती आहेत. ते स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. गवळी डोह येथील धरणातून पाणी सोडण्यात आल्याने काही पाणवठ्यांमध्ये अधूनमधून पाणी वाहत आहे. त्यामुळे तिथेही रुडी शेलडक्स मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तर ब्लॅक स्टॉर्कने अंबाखोरी क्षेत्राजवळील पाणवठ्यांवर मुक्काम ठोकला आहे.
यंदाही मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी पोहोचले आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. परिसरातील गावकरी आणि नागरिकांनाही त्यांच्या सुरक्षेसाठी आवाहन केले आहे.
- डॉ. प्रभू नाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प
जंगलात वाघ पाहण्यासाठी जाण्यासोबतच स्थलांतरित पक्ष्यांना पाहण्याचीही यंदा पर्यटकांना उत्तम संधी आहे. आपल्याकडे असलेल्या पोषक वातावरणामुळे ही पक्षी अभ्यासकांसाठीही चांगली पर्वणी आहे.
- अजिंक्य भटारकर, पक्षी अभ्यासक