महावितरणचे निम्म्याहून अधिक ग्राहक झाले डिजिटल; लघुदाब वीजग्राहकांची संख्या ५४ टक्क्यांवर
By आनंद डेकाटे | Published: April 6, 2024 03:22 PM2024-04-06T15:22:49+5:302024-04-06T15:23:25+5:30
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परिमंडलातील एकूण ९१ लाख ९२ हजार ५४८ व्यवहारांच्या माध्यमातून वीजग्राहकांनी घरबसल्या तब्बल २,२२० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला.
आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: महावितरणची वेबसाइट व मोबाईल ऍपद्वारे ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांची संख्या नागपूर परिमंडलात ५४ टक्यांवर गेली आहे तर, ऑनलाईन बिल भरणा केलेली रक्कम ६१.७२ टक्के झाली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परिमंडलातील एकूण ९१ लाख ९२ हजार ५४८ व्यवहारांच्या माध्यमातून वीजग्राहकांनी घरबसल्या तब्बल २,२२० कोटी रुपयांच्या वीजबिलांचा ऑनलाइन भरणा केला.
नागपूर जिह्यातील बुटीबोरी, कॉग्रेसनगर आणि सिव्हील लाईन्स तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विभागात ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण सर्वाधिक असून परिमंडलात सर्वत्र ऑनलाईन वीज भरण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बॅंकिंग, मोबाईल वॉलेट, मोबाईल बॅंकिंगद्वारे वीजबिल भरणा केल्यास वीज देयकामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. ही सूट मिळविण्यासाठी संबंधित ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी नसावी; तसेच वीजबिलांचा भरणा हा प्रॉम्ट पेमेंट डिस्काउंटच्या निर्धारित वेळेत करणे आवश्यक आहे.
वेबसाइट, ऍपचा वापर - महावितरणने लघुदाब वीजग्राहकांसाठी ऑनलाइन बिल भरण्यासाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट; तसेच जून २०१६ पासून मोबाईल ऍपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी नेटबॅंकिंग, क्रेडिट/डेबिट कार्डासह मोबाईल वॉलेट व कॅश कार्डसचा पर्याय उपलब्ध केला आहे. भरलेल्या रकमेच्या पावतीचा तपशीलही सोबत मिळत आहे.
ऑनलाइन झाले निःशुल्क - क्रेडिट कार्ड वगळता महावितरणचे लघुदाब वर्गवारीचे वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइनचे उर्वरित सर्व पर्याय आता निःशुल्क करण्यात आले आहेत. याआधी नेटबॅंकिंगचा अपवाद वगळता वीजबिलांचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी ५०० रुपयांपेक्षा अधिक रकमेवर शुल्क आकारण्यात येत होते; परंतु क्रेडिट कार्ड वगळता नेटबॅंकिंग, डेबिट कार्ड, कॅशकार्ड, यूपीआय, डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून ऑनलाइनद्वारे होणारा वीजबिल भरणा आता निःशुल्क करण्यात आलेला आहे.