Nagpur : बाराशेहून अधिक जुगाऱ्यांचा मोडला ‘डाव’; दीड कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 11:46 AM2022-06-29T11:46:51+5:302022-06-29T15:21:57+5:30
जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते.
योगेश पांडे
नागपूर : उपराजधानीत जुगार अड्ड्यांचे पीक फोफावले असून शहरातील विविध भागांमध्ये जुगाऱ्यांचे ‘डाव’ मांडलेले दिसून येतात. पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असूनदेखील जुगाऱ्यांवर नियंत्रण आलेले नाही. २०२२ मध्ये पहिल्या पाच महिन्यांत शहरात ५०० हून अधिक गुन्हे दाखल झाले व बाराशेहून अधिक जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. जुगाराच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जुगाऱ्यांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याचे चित्र असले तरी त्यापासून धडा घेण्याची प्रवृत्ती कमी असल्याचे दिसून येते.
जानेवारी ते मे या कालावधीत नागपूर पोलिसांकडून महिन्याला सरासरी २७ दिवस जुगाऱ्यांवर कारवाई झाली. शहराच्या विविध भागांत जुगाराचे अड्डे चालतात. बरेच जुगारी तर निर्माणाधीन इमारती, फुटपाथ किंवा अगदी पार्किंगच्या जागांमध्येदेखील डाव मांडताना दिसून येतात. अनेक बाजारांजवळदेखील सर्रासपणे असे प्रकार चालतात. नागपूर पोलिसांच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मे या कालावधीत ४९९ गुन्हे दाखल झाले. पोलिसांच्या कारवायांमध्ये १ हजार २१९ जुगाऱ्यांना अटक झाली व त्यांच्याकडून १.७३ कोटींहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बंगले, हॉटेल्स, फुटपाथवर चालतो जुगार
जुगार खेळण्यात केवळ विशिष्ट वर्गच आहे असे नाही. तर अगदी धनाढ्य लोकांकडूनदेखील जुगाराचे डाव मांडले जातात. शहरातील काही बंगले, हॉटेल्स यांच्यासह बाजारपेठांची ठिकाणे, फुटपाथ, मैदाने इत्यादी ठिकाणीदेखील जुगार चालतो. काही विशिष्ट भागांमध्ये तर जुगारमाफियांची दहशत असल्याचे चित्र आहे.
संसार उघड्यावर येतात
जुगाराची सवय लागल्यावर लोक त्यातून इच्छा असूनदेखील निघू शकत नाहीत. अनेकांची पावले खिशात दमडी नसतानादेखील जुगाराच्या अड्ड्याकडे वळतात. जुगार खेळण्यासाठी घरातील वस्तू विकणारेदेखील लोक आहेत. घरात पत्नी, मुले उपाशी असल्याचेदेखील त्यांना सोयरसुतक नसते. जुगाराच्या सवयीमुळे अनेकांचे संसार अक्षरश: उघड्यावर आले आहेत.
जानेवारी-फेब्रुवारीत सर्वाधिक कारवाया
पोलिसांकडून सातत्याने जुगाऱ्यांवर कारवाई होत असली तरी जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण अधिक होते. जानेवारी महिन्यात १०७ प्रकरणांची नोंद झाली व ३२६ जणांना अटक झाली. महिनाभरात ५९ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त झाला, तर फेब्रुवारी महिन्यात ११२ प्रकरणांमध्ये ३२० जुगाऱ्यांना अटक झाली. तर त्यांच्याकडून ४३ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मार्च महिन्यात सर्वात कमी ८५ गुन्ह्यांची नोंद झाली व १६० जणांना अटक झाली.