सकाळी नोकरी गेली, रात्री जीव गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:51 AM2017-10-02T00:51:21+5:302017-10-02T00:51:33+5:30
भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला.
कमलेश वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूविकास बँकेच्या ३६ कर्मचाºयांना सेवामुक्त करण्यात येत असल्याचा आदेश अवसायकाने जारी केला. दसºयाच्या आदल्या दिवशी संबंधित आदेश कर्मचाºयाच्या हाती पडला. आपल्या भविष्याचे काय होणार, दोन मुलींच्या शिक्षणाचे कसे होणार या चिंतेने त्याने धसका घेतला. रात्री हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि जीवच गेला. रवींद्र गुलाबराव धांडे यांच्यासोबत हा दुर्दैवी प्रकार घडला.
खरबी रोड येथील रहिवासी असलेले रवींद्र गुलाबराव धांडे (वय ५५) भूविकास बँकेत नोकरीवर होते. सरकारतर्फे या बँकेवर अवसायकाची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या ३३ महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. धांडे यांना दोन मुली आहेत. दोन्ही इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. घरचा खर्च व मुलींचे शिक्षण असा दुहेरी भार विना पगाराने उचलणे कठीण होते. मात्र, तरीही त्यांनी हिंमत सोडली नाही. कधीतरी बँक सुरळीत होईल. आपली हक्काची देणी मिळतील व सर्वकाही ठीक होईल, या आशेवर त्यांचा जीवनसंघर्ष सुरू होता.
२९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्याला सेवामुक्त करण्यात येत असल्याचा अवसायक डीडीआर सतीश भोसले यांनी काढलेला आदेश धांडे यांना मिळाला. त्यात नोकरी संदर्भातील आपली देणी उपलब्धतेनुसार व प्राधान्य क्रमानुसार दिली जातील, असे नमूद होते. पैसे कधी मिळतील याची निश्चित कालमर्यादा आदेशात नमूद नाही. हे पाहून धांडे यांना धक्का बसला. दिवसभर ते चिंताग्रस्त राहिले. दोन्ही मुलींचे इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू आहे, अजून लग्न व्हायची आहेत. अशात आपली नोकरी गेली यामुळे ते पुरते खचले. ३० सप्टेंबरच्या पहाटे या चिंतेत त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला व त्यातच त्यांचे निधन झाले. दसºयाच्या दिवशी लोक एकमेकांना सोनं देऊन शुभेच्छा देत असताना धांडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
धांडे यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या घटनेमुळे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. एकीकडे सरकार विविध प्रकल्पांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तर दुसरीकडे भूविकास बँकेच्या कर्मचाºयांना त्यांचा हक्काचा पैसा देण्यासही टाळाटाळ करून त्यांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे, असा संताप कर्मचाºयांनी व्यक्त केला आहे.
३६ कर्मचाºयांची परिस्थिती वाईट
सेवामुक्त करण्यात आलेल्या ३६ कर्मचाºयांनी शासनाच्या या भूमिकेमुळे धसका घेतला आहे. ३६ महिन्यांपासून पगार नसल्यामुळे आधीच हे कर्मचारी आर्थिक विवंचनेचा सामना करीत आहेत. अशात सरकारने सेवामुक्त करताना हक्काचे पैसे कधी मिळतील याची कालमर्यादा दिली नसल्यामुळे या कर्मचाºयांवरील मानसिक दडपण वाढले आहे.