महाराजबागेत उद्यापासून मॉर्निंग वॉकसाठी ‘नाे एंट्री’, 'हे' आहे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2022 01:09 PM2022-04-08T13:09:47+5:302022-04-08T13:11:06+5:30
येत्या ९ एप्रिलपासून महाराजबागेत माॅर्निंग वाॅकर्सवर बंदी घालण्यात आली आहे.
नागपूर : शुद्ध हवेच्या इच्छेपाेटी सकाळी फिरायला येणाऱ्यांसाठी महाराजबागेचे गेट उद्या, शनिवारपासून बंद राहणार आहे. प्राणिसंग्रहालयात नुकत्याच दाेन गटांमध्ये झालेल्या भांडणाचे निमित्त करून प्राण्यांना त्रास हाेत असण्यापर्यंतची कारणे देत आधीपासून विचारार्थ असलेला निर्णय अखेर लादण्यात आला. येत्या ९ एप्रिलपासून महाराजबागेत माॅर्निंग वाॅकर्सवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे राेज सकाळी फिरायला येणाऱ्यांचा हिरमाेड हाेणार असून ‘राेज पैसे देऊन येणाऱ्या हजाराे पर्यटकांमुळे प्राण्यांना त्रास हाेत नाही का?’ असा असंताेषपूर्ण सवाल माॅर्निंग वाॅकर्सनी उपस्थित केला आहे.
दि. ५ एप्रिल राेजी ‘महाराजबाग आराेग्य आसन मंडळा’च्या काही सदस्यांमध्ये भांडण झाले. याबाबत महाराजबाग प्रशासनाने बुधवारी सीताबर्डी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर गुरुवारी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत प्रशासनाने तडकाफडकी उद्या, शनिवारपासून प्राणिसंग्रहालयात सकाळी फिरणाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेताना इतरही कारणे सांगण्यात आली आहेत. भारतात काेणत्याही प्राणिसंग्रहालयात माॅर्निंग वाॅकर्सना परवानगी नाही. अधिक काळासाठी मानवी संपर्क आल्याने प्राण्यांवर विपरीत परिणाम हाेताहेत, ही परिस्थिती प्राणिसंवर्धनात अडथळा निर्माण करते. सकाळी फिरणारे काही नागरिक प्राण्यांना अनैसर्गिक अन्न चारण्याचाही प्रयत्न करीत असल्याची कारणे बंदी घालताना प्रशासनाने नमूद केली आहेत.
मात्र बंदीच्या निर्णयाची माहिती हाेताच माॅर्निंग वाॅकर्समध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गेली अनेक वर्षांपासून रामदासपेठ, धरमपेठ, गाेकुळपेठ, सीताबर्डी, आदी भागांतील २५० ते ३०० नागरिक राेज सकाळी महाराजबागेत फिरायला येतात, तेव्हा कधी प्राण्यांना त्रास झाला नाही, मग आताच का? सकाळी काही थाेडे लाेक फिरतात म्हणून त्रास हाेताे तर राेज हजाराे पर्यटक पैसे देऊन महाराजबागेत येतात, त्यांच्यामुळे प्राण्यांना मजा येते का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाला केवळ पैसा दिसत असून या निर्णयामागे काहीतरी गाैडबंगाल आहे, असा संशयही नागरिकांनी उपस्थित केला. या निर्णयाविराेधात आंदाेलन करू, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे हा मुद्दा सकाळच्या गारव्यात उष्णता निर्माण करील, असे चिन्ह दिसत आहे.
दि. ५ एप्रिलला दाेन गटांत भांडण झाले आणि त्याची तक्रारही पाेलीस स्टेशनला केली आहे. मात्र सकाळच्या सुमारास प्राण्यांना मानवी संपर्कापासून दूर ठेवणे व ठरावीक तासांच्या वर प्राण्यांच्या विचरणात मानवी हस्तक्षेप टाळणे, असे नियम आहेत. त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने आधीच माॅर्निंग वाॅक बंद करण्याचे निर्देश देत अन्यथा मान्यता रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे हा निर्णय घेणे, हा आमचा नाइलाज आहे.
- डाॅ. सुनील बावस्कर, व्यवस्थापक, महाराजबाग
इतक्या वर्षांपासून नागरिक महाराजबागेत फिरायला जातात. काेराेनामुळे लाेकांमध्ये शुद्ध हवा व आराेग्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. अशा वेळी हा निर्णय अन्यायकारक आहे. याविराेधात आम्ही आंदाेलन करू.
- राजेश कुंभलकर, महाराजबाग बचाव समिती
इतक्या वर्षांत कधी भांडणाचा विषय आला नाही. त्यामुळे एकदा झालेल्या भांडणाचे निमित्त करून महाराजबाग बंद करणे इतर अनेक नागरिकांसाठी अन्याय करण्यासारखे आहे. याविषयी बाेलून विषय मिटविता येताे. थेट फिरण्यावर बंदी घालणे अयाेग्य आहे. याविषयी आम्ही महाराजबाग प्रशासन व जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत जाऊ.
- राजेश जरगर, माजी नगरसेवक, सीताबर्डी