उपचारापूर्वीच मृत्यूचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:07 AM2021-03-27T04:07:29+5:302021-03-27T04:07:29+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : राज्याच्या उपराजधानीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. सलग नऊ दिवसापासून दैनंदिन रुग्णांची ...
सुमेध वाघमारे
नागपूर : राज्याच्या उपराजधानीतील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे. सलग नऊ दिवसापासून दैनंदिन रुग्णांची संख्या ३,००० ते ३,५०० वर जात आहे. मागील २५ दिवसात मेयो, मेडिकलमध्ये ४०५ रुग्णांचे मृत्यू झाले. यात ४५ रुग्णांचा मृत्यू रुग्णालयात येण्यापूर्वीच (ब्रॉट डेड) झाले तर, उपचाराच्या पहिल्या २४ तासाच्या आत ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण घरूनच गंभीर होऊन येत असल्याने त्यांना वाचविण्याचे मोठे आव्हान मेयो, मेडिकलसमोर उभे ठाकले आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे दोन नवे प्रकार समोर आले आहेत. वाढते रुग्ण व आता मृत्यूच्या वाढत्या संख्येने चिंता वाढविली आहे. देशात कोरोनाचे सर्वाधिक नवीन रुग्ण आणि सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यातील पहिल्या १० जिल्ह्यामध्ये नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोनाच्या आणीबाणीच्या काळातून प्रशासनाने विशेष उपाययोजना हाती घेतली नसल्याने, आता पुन्हा रुग्ण वाढत असतान शासकीय व खासगी रुग्णालयातील अपुऱ्या खाटा व आवश्यक सोयी कमी पडताना दिसून येत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे, कोरोनाची गंभीर लक्षणे दिसूनही काही रुग्ण रुग्णालयात येण्यास उशीर करीत आहेत. यात महानगरपालिका प्रशासन कमी पडत असल्याने ‘ब्रॉट डेड’ व उपचाराच्या पहिल्या २४ तासातच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने भीतीदायक परिस्थिती आहे.
मेडिकलमध्ये ३९ ‘ब्रॉट डेड’
मेडिकलमध्ये मागील २५ दिवसात २३० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यात ‘ब्रॉट डेड’चे प्रमाण १६.९६ टक्के म्हणजे ३९ रुग्णांचा जीव गेला आहे. तर, पहिल्या २४ तासाच्या उपचारातील मृत्यूचे प्रमाण २०.८७ टक्के म्हणजे ४८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मेयोमध्ये एकूण १७५ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील ६ ‘ब्रॉट डेड’ आहेत तर २४ तासाच्या आत मृत्यू झालेले ४७ रुग्ण आहेत. मेयो, मेडिकलचे हे दोन्ही आकडे धक्कादायक आहेत. या रुग्णांचे वेळीच निदान होऊन उपचाराखाली आले असते तर त्यांचा जीव वाचविता आला असता, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
होम आयसोलेशनच्या रुग्णांकडे लक्ष देणे गरजेचे
नागपूर जिल्ह्यात ३६,९३६ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. यातील २८,३४४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. या रुग्णांमध्ये लक्षणे वाढत असल्यास, ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची महानगरपालिकेची जबाबदारी आहे. परंतु याला कुणी गंभीरतेने घेत नसल्याचे ‘ब्रॉट डेड’ व २४ तासाच्या आत उपचारातील मृत्यूच्या संख्येवरून दिसून येते.
-‘ब्रॉट डेड’ २५ दिवसांतील
मेडिकल : ३९
मेयो : ६
-पहिल्या २४ तासाच्या उपचारातील मृत्यू
मेडिकल : ४८
मेयो : ४७