कोंढाळी भागात मृत्यूदर वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:08 AM2021-04-22T04:08:56+5:302021-04-22T04:08:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोंढाळी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोंढाळी परिसरातही बाधितांचे प्रमाण अधिक आहे. अशातच रुग्णांना वेळेवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढाळी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोंढाळी परिसरातही बाधितांचे प्रमाण अधिक आहे. अशातच रुग्णांना वेळेवर योग्य उपचार मिळत नसल्याने कोंढाळी व ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. कोरोनाच्या भीतीने अनेक आजारी रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. यासोबतच ग्रामीण भागात आजही कोरोना चाचणीबाबत ग्रामस्थांमध्ये भीती आहे. आजाराचे योग्य निदान आणि उपचाराअभावी मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. इकडे कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यसंस्कारानेही अनेक नागरिक संक्रमित होण्याचा धोका वाढला आहे.
कोरोनाचे लक्षण असलेले बहुतांश रुग्ण कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्याऐवजी कोंढाळी, काटोल व कारंजा येथील खासगी डॉक्टरांकडे उपचाराला जात आहेत. खासगी डॉक्टर उपचारासोबत कोविड चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. पण यातील काही लोकच कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणी करुन घेत आहेत. ग्रामीण भागात आजही अनेक रुग्ण कोविड चाचणी न करताच घरी उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. अशात योग्य औषध वेळेवर न घेतल्याने त्यांची ऑक्सिजन पातळी कमी होते. यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडते. अशात वेळेवर बेड मिळत नसल्याने त्यांचा घरीच मृत्यू होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन बेड हवे
कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोंढाळी व मेटपांजरा जिल्हा परिषद मंडलात जवळपास ७० गावे येतात. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काटोल ग्रामीण रुग्णालय व नरखेड ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रालाही ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, येथील सोयी -सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने पाच ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते प्रमोद धारपुरे यांनी केली आहे.