मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 02:08 PM2019-02-08T14:08:38+5:302019-02-08T14:11:22+5:30

सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..?

Mosque Introduction; Let's know, everything about the mosque .. | मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..

मस्जिद परिचय; चला, जाणून घेऊया मस्जिदविषयी सर्वकाही..

googlenewsNext
ठळक मुद्देजमाअत ए इस्लामी हिंदचा स्तुत्य उपक्रमजनमानसातील दुरावा कमी करण्यासाठीचा प्रयत्न

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: सकाळी वा संध्याकाळी एखाद्या मस्जिदमधून सर्वदूर पोहचणारा अजानचा सूर आपण सर्वांनीच ऐकला असेल. काय अर्थ असतो त्यातील शब्दांचा किंवा स्वरांचा..? किंवा मस्जिदमध्ये काही विपरित होत असतं अशी आशंका ज्यांच्या मनात भेडसावत असते त्यांना थेट मस्जिदमध्ये जाऊन पहायला व विचारायला संधी मिळाली तर?...
हो, अशी एक संधी महाराष्ट्रातील एकदोन नव्हे तर तब्बल १०० मशिदींमध्ये देण्यात येते आहे. तिचे नाव आहे, मस्जिद परिचय.
अलिकडेच नागपुरातील सर्वात जुन्या व मोठ्या अशा जामे मस्जिदमध्ये हा मस्जिद परिचयचा कार्यक्रम घेण्यात आला. यात शहरातील नागरिकांना प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमंत्रण देण्यात आले होते. यात कोणत्याही जातीधर्माचा नागरिक सहभागी होऊ शकतो. (सध्या यात स्त्रियांना प्रवेश नाही. मात्र जसं मक्का मदिना येथे स्त्रियांसाठी वेगळी व्यवस्था आहे, तशी पुढेमागे होईल अशा आशावाद आहे.) मस्जिद परिचयमध्ये नमाज पढण्याची संपूर्ण रीत कशी आहे याची माहिती दिली जाते. अजानचे स्वर कसे असतात, त्याचा काय अर्थ होतो याचीही माहिती दिली जाते. सर्व माहिती दिल्यानंतर उपस्थित नागरिकांना प्रश्न विचारण्याची संधी असते. आपल्या मनात असलेले प्रश्न ते विचारू शकतात व आपले समाधान करू शकतात.
गेल्या वर्षभरापासून हा उपक्रम महाराष्ट्रातील मशिदींमध्ये राबविला जातो आहे. नागपुरात सध्या पाच मशिदींमध्ये तो सुरू आहे आणि अजून दोनमध्ये तो होऊ घातलाय.

काय आहे उद्देश या उपक्रमामागचा?
जमाअत ए इस्लामी हिंदचे नागपूर सेंट्रलचे अध्यक्ष अशरफ बेलीन यांच्यामते, आपल्या देशात अनेक जातीधर्माचे लोक आहेत. मात्र आपले परस्परांसोबतचे संबंध तणावपूर्ण आहेत. दुरावा आहे. गैरसमज आहेत. असं पसरवलं जातंय की, मदरसामध्ये चुकीचे शिक्षण दिले जाते किंवा मशिदीत गैरप्रकार होत असतात. या शंका, हे गैरसमज दूर व्हायला हवेत. त्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे. महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात गेल्या वर्षी हा उपक्रम सुरू झाला. त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. यात आम्ही नागरिकांना आमंत्रण देतो. बऱ्याच जणांना वाटतं की अजानमध्ये अल्लाला आवाज दिला जात असतो. पण तसं नाही. यात सर्व नागरिकांना पाचारण केलं जात असतं. जे नागरिक येतात त्यांना आम्ही मस्जिद व मदरसे दाखवतो. त्यांना आम्हाला जवळून समजून घेण्याची ही संधी असते. समाजातील जातीय-धार्मिक दुरावा कमी होण्यासाठीचे हे पाऊल आहे.

कसा आहे प्रतिसाद?
हा उपक्रम सुरू होऊन जेमतेम वर्षभराचाच कालावधी होतोय. या काळात बऱ्याच नागरिकांनी यात सहभाग घेतला. मस्जिदीत जाऊन पाहिले, ऐकले, विचारले व जाणून घेतले. त्यांचे समाधान झाले आहे. हा उपक्रम अजून व्यापक होण्याची गरज आहे. अनेकजण आता फोन करून विचारतात की केव्हा आहे आता हा कार्यक्रम, आम्हाला यायचे आहे.

आपण प्रतिज्ञेत म्हणतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. या प्रतिज्ञेला मूर्त रूप देण्याचा जमाअत ए इस्लामी हिंदने सुरू केलेला हा प्रयत्न हळूहळू रुजतो आहे. येणाऱ्या पिढीला त्याची महती निश्चितच जाणवेल असा विश्वास अशरफ बेलीन पुढे व्यक्त करतात.
 

Web Title: Mosque Introduction; Let's know, everything about the mosque ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mosqueमशिद