नागपुरातील बहुतांश एटीएममध्ये खडखडाट; नागरिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:55 AM2019-06-24T10:55:42+5:302019-06-24T10:56:03+5:30
बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी व्हावी आणि व्यवहार सुरळीत व गतीने पार पडावेत यासाठी देशभरात एटीएम मशीन्सचे जाळे पसरण्यात आले. मात्र नागपुरातील बहुतांश एटीएमचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे ते बंद पडल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे पैसे असलेल्या एटीएमच्या शोधात नागरिकांना चार ते पाच कि.मी. चे अंतर कापावे लागत आहे.
मानेवाडा रोड
तुकडोजी चौक ते मानेवाडा चौक दरम्यानच्या मार्गावर बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. बाजूलाच या बँकेचे एटीएम आहे. परंतु या एटीएममध्ये अनेकदा रक्कम नसल्याने पैसे काढण्यासाठी आलेल्या एटीएमधारकांना निराश होऊ न परतावे लागते. रविवारी या एटीएममध्ये रक्कम नसल्याने एटीएमधारकांना पैसे काढता आले नाही. या परिसरात बँक ऑफ इंडियाचे एकमेव एटीएम असूनही या एटीएममध्ये पैसेच नसतात. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात, अशी माहिती एटीएमधारकांनी दिली. नागपूर नागरिक सहकारी बँके च्या मानेवाडा रोडवर नागपूर नागरिक सहकारी बँक लि.ची शाखा आहे. शाखेच्या बाजूलाच बँकेचे एटीएम आहे. बँकेच्या खातेधारकांना सुविधा व्हावी, यासाठी एटीएम सुरू करण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला होता.
मात्र या एटीएममध्ये नेहमीच पैशाचा ठणठणाट असतो. रविवारी बँक बंद असल्याने अनेक एटीएमधारक पैसे काढण्यासाठी आले होते. परंतु पैसे नसल्याने एटीएम बंद ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यावर एटीएमधारकांनी नाराजी व्यक्त केली.
मानेवाडा सिमेंट रोडवर वेणू कॉर्नरजवळ अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. या एटीएमच्या आजूबाजूला अनेक व्यावसायिक प्रतिष्ठाने आहेत.
बेसा, हुडकेश्वरकडून शहरात ये-जा करणाºया नागरिकांच्या मार्गावर हे एटीएम असल्यामुळे अनेक जण येथून पैसे काढतात. परंतु रविवारी सकाळपासून हे एटीएम बंद असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेल्या अनेक नागरिकांना परत जावे लागले.
मेहाडिया चौक
धंतोली मेहाडिया चौक धंतोली पोलीस ठाणेकडे जाणाºया रस्त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) चे एटीएम आहे. येथील एटीएम मशीन सुरू आहे. परंतु एटीएममध्ये पैसे नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
सीताबर्डी
सीताबर्डी येथील झांशी राणी चौकात बँक ऑफ इंडियाचे कार्यालय आहे. याला लागूनच बँकेचे एटीएम आहे. यात दोन एटीएम मशीन लागल्या आहेत. यापैकी एक मशीन बंद आहे. तर दुसरी मशीन बिघडली आहे.
रामेश्वरी रोड
रामेश्वरी मार्गावर तीन ते चार विविध बँकेचे एटीएम आहे. परंतु यातील युनियन बँकेचे एटीएम नेहमीच बंद राहत असल्याने बँकेच्या ग्राहकांना इतर एटीएमची सेवा घ्यावी लागते. विशेष म्हणजे, या मार्गावरील चारही ‘एटीएम’वर सुरक्षा रक्षक राहत नाही. काही एटीएमची दारे बंद होत नाही. वातानुकूलित यंत्राची सोय असताना ते नेहमीच बंद असते. अनेकवेळा एटीएममध्ये कुत्री बसलेली असतात.