प्राची अग्रवालला सर्वाधिक पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:08 AM2021-03-27T04:08:44+5:302021-03-27T04:08:44+5:30
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा २३ एप्रिल रोजी नियोजित १०८ वा दीक्षांत समारंभ ‘कोरोना’मुळे होणार की नाही, ...
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा २३ एप्रिल रोजी नियोजित १०८ वा दीक्षांत समारंभ ‘कोरोना’मुळे होणार की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, विद्यापीठातर्फे गुणवंतांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदादेखील गुणवंतांमध्ये विद्यार्थिनींचेच जास्त प्रमाण आहे. विद्यापीठाद्वारे संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्राची अग्रवाल हिचा सर्वाधिक अकरा पदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात विद्यापीठाने संकेतस्थळावर अंतिम पदक तालिकादेखील जाहीर केली आहे. यंदाच्या दीक्षांत समारंभात पदके व पारितोषिकांची संख्या १९५ इतकी राहणार आहे.
दीक्षांत समारंभात विविध विद्याशाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येईल. १०७ व्या दीक्षांत समारंभाच्या तुलनेत यंदा पदकांची संख्या एकने वाढली आहे. प्राची अग्रवालला ‘एलएलबी’त (पाच वर्षीय अभ्यासक्रम) सर्वाधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात येईल. त्यापाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीजचा विद्यार्थी आदित्य खोडे व विद्यापीठाच्या पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील एम.एस्सी.ची विद्यार्थिनी गौरी जोशी यांचा प्रत्येकी सात पदके व पुरस्कारांनी सन्मान करण्यात येईल. विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातील विद्यार्थी अमोल धाकडे व अंजुमन महाविद्यालयातील बी.ई.ची विद्यार्थिनी पूनम बेलेकर यांचा सहा पदके-पारितोषिकांनी सन्मान करण्यात येईल.
हे आहेत गुणवंत
नाव -अभ्यासक्रम-महाविद्यालय-पदके-पारितोषिक
प्राची अग्रवाल-बीए,एलएलबी (५ वर्षे)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयातील -११
आदित्य खोडे-एमबीए - डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज-७
गौरी जोशी -एमएस्सी (रसायनशास्त्र)-पदव्युत्तर रसानयशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ - ७
अमोक धाकडे- एम.ए. (आंबेडकर विचारधारा)-पदव्युत्तर आंबेडकर विचारधारा विभाग, नागपूर विद्यापीठ - ६
पूनम बेलेकर-बी.ई. -अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालय-६
पूजा बुरडकर-एम.ए. (मराठी) -वसंतराव नाईक शासकीय कला महाविद्यालय-५
श्वेता कामडी-बी.जे. -जनसंवाद विभाग, नागपूर विद्यापीठ -४