पोलीस, महसूल खात्यात सर्वाधिक लाचखोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:12 PM2019-12-23T20:12:31+5:302019-12-23T20:19:07+5:30
२०१९ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१९ मधील पहिल्या ११ महिन्यांत एकूण ९८ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. दर महिन्याची आकडेवारी सरासरी ९ इतकी होत आहे. मागील वर्षी हीच सरासरी प्रति महिना १० इतकी होती. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये घट झाली आहे. विशेष २०१९ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी अडकले. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१९ या वर्षभरातील लाच प्रकरणे, त्यात अडकलेले अधिकारी-कर्मचारी, झालेली कारवाई इत्यादीसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली होती. यातून मिळालेल्या
आकडेवारीनुसार २०१९ मध्ये वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत ९८ सापळा प्रकरणांमध्ये १२५ आरोपी अडकले. त्यांच्याकडून ९ लाख ७६ हजार ७०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
एकूण सापळ्यांत अडकलेल्यांमध्ये महसूल विभागातील २५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, तर पोलीस विभागातील २६ जणांवर कारवाई झाली. याशिवाय जिल्हा परिषदेतील १०, एमएसईबीतील ८, शिक्षण विभागातील ९, पंचायत समितीमधील ६, खासगी क्षेत्रातील ८ जणांवर कारवाई झाली.
‘क्लास वन’चे ६ अधिकारी सापळ्यात
१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१९ या कालावधीत एकूण ६ ‘क्लास वन’ अधिकाऱ्यांवर लाच घेतल्याप्रकरणी कारवाई झाली. यात महसूल विभागातील ३, तर ‘आयटीआय’, ग्रामविकास व शिक्षण विभागातील प्रत्येकी एका अधिकाऱ्याचा समावेश होता. तर दुसºया श्रेणीतील १२ जणांवर कारवाई झाली. तृतीय श्रेणीतील ७५ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
९५ महिन्यांत ९१५ प्रकरणे
२०१२ पासून नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातर्फे लाचखोरीची ९१५ प्रकरणे समोर आणण्यात आली. २०१२ ते २०१५ मध्ये हे प्रकरणांचे प्रमाण सातत्याने वाढत होते. मात्र त्यानंतर एकूण सापळ्यांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले.
दोषसिद्धीची टक्केवारी
वर्ष शिक्षेची टक्केवारी
२०१५ २० %
२०१६ १५ %
२०१७ २४ %
२०१८ १६ %
२०१९ (नोव्हेंबरपर्यंत) १३ %
वर्षनिहाय प्रकरणे
वर्ष प्रकरणे
२०१२ ५१
२०१३ ७२
२०१४ १५५
२०१५ १७३
२०१६ १३५
२०१७ ११०
२०१८ १२१
२०१९ (नोव्हेंबरपर्यंत) ९८
श्रेणीनिहाय लाचखोर @ २०१९
श्रेणी आकडा
वर्ग १ ६
वर्ग २ १२
वर्ग ३ ७५
वर्ग ४ ५
इलोसे ११
खासगी १६
दोषसिद्धीचा दर कमीच
लाच घेताना अडकलेल्यांना न्यायालयात शिक्षा मिळण्याचे प्रमाण फारच कमी आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या केंद्रांवर २०१९ मध्ये १३ टक्के आरोपींना शिक्षा झाली. २०१८ मध्ये हेच प्रमाण १६ टक्के इतके होते, तर २०१७ मध्ये २४ टक्के आरोपींना शिक्षा झाली होती.