वर्षभरात वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:15 PM2019-02-28T22:15:40+5:302019-02-28T22:16:22+5:30
नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागात २०१८ या एका वर्षात २४८ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले. विभागातील एकूण सहा जिल्ह्यांपैकी वर्धा जिल्ह्यात आत्महत्येचे सर्वाधिक प्रमाण दिसून आले. तर गडचिरोलीतील आकडेवारी सर्वात कमी ठरली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी महितीच्या अधिकारांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे शेतकरी आत्महत्यासंदर्भात विचारणा केली होती. वर्ष २००१ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर विभागात जिल्हानिहाय किती शेतकऱ्यांची आत्महत्या झाली, किती शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आली व किती प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरली, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत नागपूर जिल्ह्यात २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली व तेवढे अर्ज मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. यातील केवळ १२४ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली.
सर्वाधिक ९३ आत्महत्या वर्धा जिल्ह्यात नोंदविण्यात आल्या. यापैकी ५७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष मदत मिळाली, तर २३ प्रकरणे अपात्र ठरली. वर्ध्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात ५६ तर नागपूर जिल्ह्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. चंद्रपूरमध्ये ३४ तर नागपुरात केवळ ८ शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी १३ आत्महत्या झाल्या. मात्र तेथील ११ प्रकरणे अपात्र ठरली व दोन कुटुंबीयांनाच मदत मिळाली.
२००१ पासून वर्ध्यात १६०० हून अधिक आत्महत्या
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, २००१ ते २०१८ या १८ वर्षांच्या कालावधीत नागपूर विभागात तब्बल ४००७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यात एकट्या वर्धा जिल्ह्यात १६४६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याखालोखाल चंद्रपूर (७५८), नागपूर (७३७), भंडारा (५३९), गोंदिया (२५०) व गडचिरोली (७७) या जिल्ह्यांचा समावेश आहे.