नागपुरातील तुंबलेल्या बहुतांश नाल्यांमध्ये आढळले प्लास्टिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 10:35 AM2018-07-07T10:35:52+5:302018-07-07T10:38:02+5:30
शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शुक्रवारी मुसळधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले. अनेक वस्त्यांमधील घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे अनेकांना सामान इतरत्र हलवावे लागले. अनेक वस्त्यांमधील ड्रेनेज लाईनमध्ये प्लास्टिक अडकून पाणी तुंबल्याने गडर-नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर आले. त्यामुळे थेट शहरात पूरजन्य आणि आपात स्थिती निर्माण झाली होती. या कारणांमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्लास्टिकचा उपयोग योग्य वा अयोग्य हे आता नागरिकांनी रस्त्यांवर निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीवरून ठरवावे. काही वर्षांपूर्वी मुंबईत प्लास्टिक नाल्यांमध्ये तुंबल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली होती.
पण आता शासनाने २२ जूनपासून प्लास्टिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आणि थर्माकोलपासून तयार केलेले ताट, कप्स, प्लेटस, ग्लास, वाटी, चमचे आदीं वस्तूंची विक्री आणि वापरावर बंदी आणली. याच वस्तू शुक्रवारी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्यावर तरंगताना दिसून आल्या.
अनेक भागात प्लास्टिकमुळे पाणी वाहून जाण्यास खोळंबा
प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तू नाल्यात तुंबल्यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यांवर आले. शहरातील अनेक भागात युवकांनी नाल्यांच्या तोंडाशी असलेले प्लास्टिक हटवून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी जागा मोकळी केली. दुपारी १२ च्या सुमारास धंतोली भागातील रेल्वे पुलाखाली नागनदीला पूर आला होता. त्यावेळी पाण्यावरून प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वाहून जात होते. पुराचे पाणी नदीतून रेल्वे पुलाखालील रस्त्यावर येत असताना पाण्यासोबत प्लास्टिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वाहून येत होते. शासनाने प्लास्टिकवर बंदी आणली, पण नागरिकांनाही तेवढ्याच सजगतेने बंदीचा स्वीकार केला पाहिजे. शुक्रवारी प्लास्टिकने तुंबलेल्या नाल्यांचा बोध नागरिकांना घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
नागरिक दैनंदिन वापराच्या वस्तू छोट्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये घरी आणतात आणि उपयोगानंतर सवयीप्रमाणे त्या रस्त्यांवर फेकतात. त्या नंतर नाल्यांच्या तोंडाशी जमा होतात. मुसळधार पावसानंतर त्या नाल्यात फसतात. शुक्रवारी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य स्थितीसाठी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जबाबदार आहे.
व्यापाऱ्यांनीही बंदीचा स्वीकार करावा
प्लास्टिकबंदीमुळे व्यवसाय बंद पडतील आणि बेरोजगारी वाढले, अशा वल्गना व्यापाऱ्यांनी पावसामुळे घडलेल्या घटनांवरून बोध घेऊन करू नये. किराणा दुकानदारांनी प्लास्टिकचा बंदी कटाक्षाने पाळल्यास ग्राहकसुद्धा कापडी थैल्यांचा उपयोग करतील आणि हळूहळू प्लास्टिक रस्त्यांवर दिसणार नाही तसेच मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पूरजन्य स्थिती निर्माण होणार नाही.