नागपूर जिल्ह्यात कामठी विधानसभेत सर्वाधिक मतदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:28 PM2019-09-16T12:28:32+5:302019-09-16T12:30:22+5:30
नागपूर जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाखाच्यावर पोहोचली आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वात कमी मतदार काटोल विधानसभा क्षेत्रात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून प्रशासनानेही कंबर कसली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सर्व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मतदार वाढविण्याचाही प्रयत्नही होत आहे. जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४१ लाखाच्यावर पोहोचली आहे. कामठी विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या सर्वात जास्त असून, सर्वात कमी मतदार काटोल विधानसभा क्षेत्रात आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेकरिता निवडणूक होणार आहे. या आठवड्यात आचारसंहिता लागणार असून, आॅक्टोबर महिन्यात मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक सर्व कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मनुुष्यबळ पुरविण्यासाठी सर्व विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. कर्मचारी न देणाऱ्या विभागप्रमुखांवर कारवाई करण्यासोबत वेतन रोखण्याचा इशाराही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी होती. त्यामुळे विधानसभेत ती वाढविण्याचा प्रशासनाचा जोर आहे. नवीन मतदारांची नावे जोडण्यासोबत मृत पावलेल्या मतदारांची नावे वगळण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात आले. नवीन मतदार नोंदणीकरिता विशेष अभियानही राबविण्यात आले. याचा चांगला परिणाम समोर आला आहे. जिल्ह्याची मतदार संख्या आजच्या घडीला ४१ लाख ६३ हजार ३६७ आहे. यात पुरुष मतदार २१ लाख ३१ हजार १४९ तर महिला मतदारांची संख्या २० लाख ३२ हजार ११८ आहे. तर १०० मतदार तृतीयपंथी आहेत. मतदारांच्या संख्येत वाढ होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.