कुख्यात गॅंगस्टर आबू खानला भंडाऱ्यातून अटक; ४० हून अधिक प्रकरणांत गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 10:33 AM2022-06-06T10:33:47+5:302022-06-06T10:38:42+5:30
मार्च महिन्यात या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. पोलिसांनी त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र, तो फरारच होता.
नागपूर : कुख्यात गॅंगस्टर आबू खानला अटक करण्यात अखेर नागपूर पोलिसांना यश आले आहे आहे. झोन चारचे उपायुक्त नुरूल हसन यांच्या नेतृत्वातील चमूने आबूला ताब्यात घेतले. आबूविरोधात ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते व अनेक दिवसांपासून तो फरार होता.
आबू खान हा कुख्यात गुंड असून, अनेक वर्षांपासून तो विविध गैरप्रकारांमध्ये सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिवे मारण्याची धमकी देणे, मालमत्ता हस्तगत करणे आदींमुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. ताजबागजवळील अमजद हुसेन या व्यक्तीच्या तर सहा दुकानांवर त्याने बळजबरीने ताबा मिळविला होता. हुसेन यांच्या तक्रारीनंतर आबू व त्याचे भाऊ अमजद व शहदाजा खान यांच्याविरोधात मकोका लावण्यात आला होता. तेव्हापासून आबू फरारच होता. मार्च महिन्यात या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली होती. पोलिसांनी त्याच्या भावांना अटक केली होती. मात्र, तो फरारच होता. खबऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. तो भंडारा येथे असल्याची टीप पोलिसांना मिळाली. तातडीने नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचा चमू भंडाऱ्याकडे रवाना झाला. तेथे सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
अमरावती, अहमदाबादमध्ये लपला होता आबू
फरार झाल्यानंतर आबू सातत्याने त्याचे ‘लोकेशन’ बदलत होता. अमरावती, अहमदाबाद, गडचिरोली इत्यादी ठिकाणीदेखील तो लपला होता. अखेर त्याला भंडारा येथून अटक करण्यात आली.