उत्तर प्रदेश पोलिसांवर गोळीबार करणारा मोस्ट वॉन्टेड अपजित पांडे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 11:05 PM2020-07-19T23:05:37+5:302020-07-19T23:05:58+5:30
नंदनवन पोलिसांनी मुसक्या आवळल्या; न्यायालयीन कोठडीत रवानगी
नागपूर : उत्तर प्रदेश पोलिसांच्या पथकावर गोळीबार करून पळून गेलेला आणि ठिकठिकाणच्या पोलिसांना वॉन्टेड असलेला कुख्यात गुन्हेगार अपजित उर्फ अभिजीत सोमनाथ पांडे (वय ३२) याच्या नंदनवन पोलिसांनी शनिवारी रात्री मुसक्या बंद बांधल्या. त्याच्याकडून एक भलामोठा चाकूही जप्त करण्यात आला.
कुख्यात पांडे हा उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातील रहिवासी आहे. गुन्हेगारांची एक मोठी टोळी तो चालवितो. विविध राज्यात तो आणि त्याची टोळी चोऱ्या, लूटमार, दरोडे आणि घरफोडीचे गुन्हे करतो. एका राज्यात गुन्हा केल्यानंतर पांडे दुसरीकडे जाऊन लपतो. नागपुरातील नंदनवन परिसरातील राजनगर हमारी पाठशाला जवळ तो दडून बसला होता.
सहा महिन्यापूर्वी हुडकेश्वर मध्ये त्याने घरफोडीचा गुन्हा केला आणि उत्तर प्रदेशात पळून गेला. १५ जुलैला त्याने कौशांबी जिल्ह्यातील सैनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत टोळीसह दरोडा घालण्याचा प्रयत्न केला. नेमक्या वेळी पोलीस पथक त्याच्याकडे धावले असता त्याने पोलीस पथकावर गोळीबार करून पळ काढला. यावेळी यूपी पोलिसांनी त्याच्या ७ साथीदारांना पकडले. पांडे मात्र पळून गेला. तो नागपुरातील वाठोडा परिसरात लपून बसला होता. दरम्यान, यूपी पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले आणि नंदनवन पोलिसांना कळविले. कौशांबी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मदन मोहन हे येथील पोलीस उपायुक्त विवेक मासाळ आणि नंदनवनचे ठाणेदार संदीपान पवार यांच्या संपर्कात होते. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार पवार यांनी आपल्या सहकाऱ्यांना पांडेला शोधण्यासाठी कामी लावले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरविंद भोळे, सहायक निरीक्षक शंकर धायगुडे, हवालदार संजय साहू, नायक संदीप गवळी, भीमराव ठोंबरे आणि शिपाई विनोद झिंगरे यांनी शनिवारी रात्री १०च्या सुमारास पांडेचा पत्ता काढून त्याला गोपालकृष्ण नगरातील काश्मीरा गॅरेजजवळ गाठले. पळून जाण्याच्या प्रयत्नात पांडेने पोलिसांशी झटापट केली. भलामोठा चाकूही काढला. मात्र, पोलिसांनी त्याच्या मुसक्या बांधून त्याला ठाण्यात आणले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला कारागृहातील कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
यूपी पोलीस दाखल
कुख्यात पांडेच्या मुसक्या बांधल्याची माहिती पोलीस उपायुक्त मासाळ आणि ठाणेदार पवार यांनी कौशांबी जिल्हा पोलिस अधीक्षकांना रात्रीच कळविली. त्यानुसार तेथील पोलीस पथक रविवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाले. सोमवारी हे पथक कुख्यात पांडेचा रिमांड मिळवून त्याला ताब्यात घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तो हुडकेश्वर मधील घरफोडीच्या गुन्ह्यात फरार आरोपी असल्याने गुन्हे शाखा पोलीस सुद्धा त्याचा ताबा मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहेत.