मोस्ट वाँटेड कुख्यात नब्बू आणि हाटे बंधू जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:09 AM2021-03-24T04:09:17+5:302021-03-24T04:09:17+5:30
नब्बूच्या मध्य प्रदेशात बांधल्या मुसक्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार नब्बू उर्फ ...
नब्बूच्या मध्य प्रदेशात बांधल्या मुसक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार नब्बू उर्फ छोटे नवाब आणि कालू उर्फ शरद तसेच भरत हाटे या तिघांच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी नागपूर पोलिसांनी बजावली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
कोट्यवधीच्या जमिनीच्या वादातून आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यासाठी गँगस्टर रंजीत सफेलकर याने पाच कोटींची सुपारी घेतली. सफेलकरने त्याचा राईट हॅण्ड कालू उर्फ शरद घाटे याच्यामार्फत ही सुपारी पावणेदोन कोटी रुपयांत नब्बू या कुख्यात गुंडाला पलटविली. नब्बूने शहाबाज नामक गुंडाच्या मदतीने मध्य प्रदेशातील सुपारी किलर राजा तसेच बाबा आणि उत्तर प्रदेशातील शूटर परवेज या तिघांना पन्नास लाखांत हायर केले. त्यानंतर ६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ७ च्या सुमारास राजा, परवेज आणि बाबाने निमगडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.
प्रथम स्थानिक पोलीस आणि नंतर सीबीआयकडून या खळबळजनक हत्याकांडाचा तपास झाला. मात्र आरोपींचा छडा लावण्यात त्यांना यश आले नाही. परंतु पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अनडिटेक्ट मर्डरच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या निमगडे हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कामी लावली. त्यानंतर महिनाभरापूर्वी या हत्याकांडातील आरोपींची नावे अधोरेखित केली. दरम्यान, आपल्या आजूबाजूचे आरोपी पोलिसांनी उचलल्याचे लक्षात येताच गँगस्टर सफेलकर, कालू हाटे आणि नब्बू हे तिघेही फरार झाले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. दरम्यान, या हत्याकांडाचा छडा लागल्यापासून गँगस्टर सफेलकर, हाटे, नब्बू, राजा, बाबा आणि परवेज या सहा जणांचा पोलीस अविश्रांत शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर, कालू हाटे राजस्थानमधील अजमेर येथे दडून बसला असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथक तिकडे पाठविण्यात आले. सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये छापा मारून या पथकाने कालू हाटेसोबतच त्याचा भाऊ भरत हाटे या दोघांच्या मुसक्या बांधल्या. दुसरीकडे मध्य प्रदेशातील शिवनीजवळ लपून बसलेल्या कुख्यात नब्बूच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.
---
आज पोहोचणार नागपुरात
नब्बूला आज नागपुरात आणण्यात आले असून, कुख्यात हाटे बंधूला घेऊन पोलीस पथक बुधवारी सकाळपर्यंत नागपुरात येईल, असेही आयुक्त अमितेशकुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---