नागपुरातील मोस्ट वॉन्टेड नौशादला सिनेस्टाईल अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:31 AM2019-07-20T00:31:45+5:302019-07-20T00:32:52+5:30
हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान याच्या पाचपावली पोलिसांनी आज सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्या, अपहरण, खंडणी वसुली, फायरिंग या आणि अशाच अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला खतरनाक गुन्हेगार मोहम्मद नौशाद पीर मोहम्मद खान याच्या पाचपावली पोलिसांनी आज सिनेस्टाईल मुसक्या बांधल्या. पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी त्याने आधी पिस्तुल काढले तर नंतर एका पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला केला. त्यात एका पोलिसाला जखम झाली. मात्र, पोलिसांनी तशाही स्थितीत त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.
खतरनाक गुन्हेगारांच्या टोळ्यांपैकी एक टोळी (इप्पा गँग) चालविणारा नौशाद खान गुन्हेगारी जगतात अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. नौशाद आणि त्याचा भाऊ इप्पा हे दोघेही अत्यंत क्रूर आणि खतरनाक गुन्हेगार म्हणून कुख्यात आहेत. त्यांच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न, जमिनी बळकावणे, अपहरण, खंडणी वसुली करणे, पोलिसांवर हल्ले करणे, अमली पदार्थ तस्करी, पिस्तुल बाळगणे, फायरिंग करणे, असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी एमपीडीए, मकोका, तडीपारीसारखी कारवाई केली आहे. दीड वर्षांपूर्वी नौशादविरुद्ध तहसील पोलिसांनी लावलेल्या मकोकाच्या गुन्ह्यानंतर तो फरार झाला. सहा महिन्यांपूर्वी तो घरी परतल्याचे कळाल्याने त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर आणि सहकाऱ्यांवर नौशाद आणि त्याच्या साथीदारांनी जोरदार हल्ला केला होता. पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली होती. तेव्हापासून नौशाद फरार होता. मध्यंतरी पाचपावली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी राजस्थान अजमेरपर्यंत धाव घेतली होती. त्यावेळी नौशादचे १२ साथीदार पोलिसांच्या हाती लागले. मात्र, नौशाद पळून गेला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या घराभोवती खबरे पेरून बसले होते. शुक्रवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास नौशाद घरी आल्याची माहिती पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना कळाली. त्यांनी लगेच आपल्या ताफ्यासह नौशादच्या नोगा कंपनी, मोतीबाग नाल्याजवळच्या घराकडे धाव घेतली. पोलिसांनी नौशादच्या घराला सिनेस्टाईल वेढा घातला. त्याची कुणकुण लागताच नौशाद पोलिसांना शिवीगाळ करीत पळून जाण्याच्या प्रयत्न करू लागला. कंबरेत पिस्तुल आणि दुसरीकडे भला मोठा चाकू होता. पोलिसांना तो आव्हान देत पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, तयारीत असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याचे पिस्तूल हिसकावून घेतले.
त्यामुळे नौशादने कंबरेतील चाकू काढला. तो ताब्यात घेण्याच्या प्रयत्न करणाऱ्या राजेश देशमुख नामक पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला चाकू लागला. ठाणेदार मेश्राम, राजेश देशमुख आणि सहकाऱ्यांनी तशाही स्थितीत न घाबरता नौशादला जेरबंद केले. त्याला लगेच आपल्या वाहनात कोंबून पाचपावली ठाण्यात नेण्यात आले.
वस्तीत प्रचंड तणाव
नौशाद जेथे कुठे असतो, त्याच्या अवतीभवती त्याचे गुंड साथीदार घुटमळत असतात. वस्तीत त्याला पकडण्यासाठी पोलीस आले की त्याचे साथीदार वस्तीतील लोकांना, विशेषत: महिलांना समोर करून दगडफेक करणे, वाहनांना अडविणे, पोलिसांची कोंडी करून त्यांना मागे फिरण्यास बाध्य करणे, असे फंडे वापरतात. आजही तसेच झाले. नौशादला पोलिसांनी जेरबंद करताच मोठ्या संख्येत त्याचे साथीदार जमा झाले. त्यांनी महिलांना पुढे करून पोलिसांवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी तत्परता दाखवत नौशादला आपल्या वाहनात कोंबून पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस बळ (आरसीपी) बोलवून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. वृत्तलिहिस्तोवर पोलीस झडतीचे काम सुरू होते. तर, वस्तीतील त्याचे काही उपद्रवी साथीदार घोषणाबाजी करत असल्याने परिसरात तणावसदृश वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी धिटाईने त्यांना पिटाळून लावले.
पिस्तूल, दोन कट्टे, चाकू जप्त
मोस्ट वॉन्टेड नौशाद खान याच्या पाचपावली पोलिसांनी मुसक्या बांधल्याचे तसेच त्याला पकडताना एका पोलीस कर्मचाऱ्यावर त्याने चाकू हल्ला केल्याचे कळाल्याने परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर यांनी लगेच पाचपावली ठाण्यात धाव घेतली. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनीही नौशादच्या अटकेबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानंतर पाचपावली पोलिसांना कारवाईच्या संबंधाने आवश्यक ते निर्देश दिले. दरम्यान, नौशादजवळून पोलिसांनी आधीच एक पिस्तूल आणि चाकू जप्त केला होता. घरझडतीत आणखी दोन देशी कट्टे आणि जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केले.