पोटच्या गोळ्याला सेप्टिक टँकमध्ये फेकणाऱ्या आईला अटक; बाळाचे नशीब बलवत्तर, राहिले जिवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 08:16 PM2022-06-29T20:16:52+5:302022-06-29T20:17:15+5:30

Nagpur News पोटच्या गोळ्याला सेप्टिक टँकमध्ये फेकून पळ काढलेल्या आईला कळमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

Mother arrested for throwing stomach pill into septic tank; The baby's luck was strong, he survived | पोटच्या गोळ्याला सेप्टिक टँकमध्ये फेकणाऱ्या आईला अटक; बाळाचे नशीब बलवत्तर, राहिले जिवंत

पोटच्या गोळ्याला सेप्टिक टँकमध्ये फेकणाऱ्या आईला अटक; बाळाचे नशीब बलवत्तर, राहिले जिवंत

Next
ठळक मुद्देमूर्ती फार्महाउस मौजा राऊळगाव येथील घटना

नागपूर : ‘माता न तू वैरिणी...’ या उक्तीचा प्रत्यय देणारी संतापजनक घटना कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव शिवारातील मूर्ती फार्महाउसवर घडली. चक्क आईनेच पोटच्या गोळ्याला सेप्टिक टँकमध्ये फेकून पाेबारा केला. नशीब बलवत्तर असल्याने १२ तासांनंतरही सेप्टिक टँकमध्ये राहून एक दिवसाचे बाळ जिवंत राहिले. ही हृदय पिळवटणारी घटना १९ जूनला मध्यरात्रीनंतर २ वाजताच्या सुमारास घडली होती.

पोलिसांनी देवदूताच्या रूपात येऊन नवजात बालकाला नवे जीवन दिले. या प्रकरणी बाळाला फेकणाऱ्या आईला कळमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.

कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील राऊळगाव येथे मूर्ती फार्महाउस आहे. या फार्महाउसवर काल्पनिक नाव चेतना (३४) (रा. गिरोला पांढराबोडी, जि. गोंदिया) (हल्ली मुक्काम मूर्ती फार्महाउस, राऊळगाव, ता. काटोल) ही महिला पतीसह राहते. घटनेच्या दिवशी या महिलेची प्रसूती फार्महाउसवरच झाली. मात्र महिलेच्या पतीने अगोदरच नसबंदी केल्याने हे मूल कुणाचे, असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे महिलेने कठोर निर्णय घेत एक दिवसाच्या बाळाला घराच्या आणि बाथरूमच्या पाणी जाणाऱ्या दहा फूट खोल असलेल्या चेंबरमध्ये फेकून देत घटनास्थळावरून पतीसह पोबारा केला होता.

मात्र थोड्याच अंतरावर असलेल्या एका झोपड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला नवजात बालक रडत असल्याचा आवाज आला. मात्र तो आवाज नेमका कुठून येत आहे ते कळायला मार्ग नव्हता. लगेच त्या व्यक्तीने कोहळीचे पोलीस पाटील प्रवीण वानखेडे यांना माहिती दिली. पोलीस पाटील प्रवीण वानखेडे यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनला ती माहिती देताच पोलीस निरीक्षक आसिफ राजा शेख यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांच्यासह त्यांनी स्वत: घटनास्थळाची पाहणी केली. ज्या खड्ड्यातून आवाज येत होता त्याला वरून झाकण होते. पोलिसांनी झाकण उघडून बघितले असता कापडामध्ये गुंडाळलेले एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक रडत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी खड्ड्यामध्ये उतरून बाळाला बाहेर काढले. त्याला जखम झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला उपचारार्थ मेयो हॉस्पिटल नागपूर येथे दाखल केले.

पोलिसांनी तपासाअंती आरोपी महिला चेतना हिला अटक केली असून आरोपी महिला आणि तिच्या पतीचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत काढण्यात आलेले डी.एन.ए. चे नमुने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार आसिफ राजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम करीत आहे.

Web Title: Mother arrested for throwing stomach pill into septic tank; The baby's luck was strong, he survived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.