आईने केला मुलीचा खून

By admin | Published: July 17, 2016 01:26 AM2016-07-17T01:26:40+5:302016-07-17T01:26:40+5:30

प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली.

The mother committed murder of the girl | आईने केला मुलीचा खून

आईने केला मुलीचा खून

Next


प्रेमसंबंधातून गर्भधारणा : बदनामीच्या धाकाने आत्महत्येचा कांगावा
वाडी / नागपूर : प्रेम संबंधातून गर्भवती झालेल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर आत्महत्येचा कांगावा करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली. वाडी येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. अंकिता समाधान मेश्राम (वय १९) असे मृत तरुणीचे तर मुक्ताबाई समाधान मेश्राम (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे.
गणेश चौक, आंबेडकर नगर वाडी येथे राहणारे मेश्राम कुटुंबीय अत्यंत गरीब आहे. समाधान मेश्राम (वय ५२) हे मोलमजुरी करतात. त्यांना दोन मुले असून, ते एमआयडीसीत कामाला जातात. तर, सर्वात छोटी मुलगी अंकिता हिने नववीनंतर शाळा सोडली. ती तिच्या आईसोबत घरीच छोटेमोठे काम करायची. अंकिता हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते.

मृतदेह पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : तरुणाशी शरीरसंबंध प्रस्थापित झाल्याने अंकिताला गर्भधारणा झाली. गुरुवारी दुपारी तिला चक्कर आल्यानंतर मुक्ताबाईने तिला दवाखान्यात नेले. त्यानंतर अंकिता गर्भवती असल्याची धक्कादायक बाब समोर आली. अस्वस्थ झालेल्या मुक्ताबाईने अंकिताला तिच्या प्रियकराबाबत विचारणा केली. मात्र, ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. बदनामीच्या धाकापोटी मुक्ताबाईने तिला गर्भपात करण्याची विनंती केली. अंकिताने त्याला विरोध केला. त्यामुळे १३ जुलैच्या मध्यरात्री पुन्हा मायलेकीत कडाक्याचे भांडण झाले. यानंतर दोघीही आजूबाजूला झोपी गेल्या. अविवाहित मुलीला गर्भधारणा झाल्याने समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, या कल्पनेने मुक्ताबाई कमालीची संतापली होती. मध्यरात्रीनंतर तिने अंकिताच्या गळ्यात असलेला स्कार्फ करकचून आवळला आणि तिचा खून केला.

१४ जुलैला सकाळी ९ च्या सुमारास अंकिताला झोपेतून उठवण्याचे प्रयत्न केले. नंतर स्वत:च १०८ क्रमांकावर फोन करून अ‍ॅम्बुलन्स बोलावली. अंकिताचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. परिसरातील एका जणाने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. वाडीच्या उपनिरीक्षक धनश्री कुटेमाटे आपल्या ताफ्यासह तेथे पोहचल्या. त्यांनी अंकिताचा मृतदेह ताब्यात घेतला. मेयोतील डॉक्टरांना या संशयास्पद प्रकरणाची माहिती देऊन तातडीने शवविच्छेदन अहवाल देण्याची विनंती केली.

अंकिताने गळफास घेतला नसून, तिचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष अहवालातून नोंदवला.(प्रतिनिधी)


तो कोण आहे?
वैद्यकीय अहवालाच्या आधारे शुक्रवारी दुपारी अंकिताच्या कुटुंबीयांना वाडी पोलिसांनी विचारपूस केली. प्रारंभी असंबद्ध उत्तरे देणारी मुक्ताबाई पोलिसांच्या चौकशीत जास्त वेळ लपवाछपवी करू शकली नाही. तिने शुक्रवारी सायंकाळी अंकिताच्या खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. शनिवारी तिला कोर्टात हजर करून तिचा २१ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला. विशेष म्हणजे, अंकिताला गर्भवती करणारा आणि नंतर या घटनेला कारणीभूत असलेला तो तरुण कोण, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Web Title: The mother committed murder of the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.